लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. मृत शांतिनगर येथील रहिवासी ३० वर्षीय आशिष नामदेव देशपांडे आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूरज मेश्राम, निखील मेश्राम, रॉकी मेश्राम, आशु मेश्राम व आदर्श ढोके आहे.नालंदा चौक परिसरातील वस्तीमध्ये अरुंद गल्ल्या आहे. येथूनच मृत आशिषचे येणेजाणे होते. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आशिषचा एका महिलेशी वाद झाला. महिलेने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर शांतिनगर पोलीस घटनास्थळी पोहचले, पण आशिष तेथून निघून गेला होता. पोलीस गेल्यानंतर पुन्हा रात्री ११.३० वाजताच्या सुमारास तो आला. पुन्हा त्याच महिलेशी वाद घालू लागला. त्या महिलेने वस्तीतील लोकांना फोन करून आशिष आल्याचे कळविले. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणारेही तिथे पोहचले. त्यांनी आशिषवर हल्ला केला. त्याच्या डोक्यावर रॉड आणि फर्शीने वार केला. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांच्या ताब्यातून तो पळू शकला नाही. आशिषचा वाद झाल्याची माहिती मिळताच त्याची पत्नी अर्पिता घटनास्थळी पोहचली. आरोपींकडून हल्ला होत असल्याचे बघून तिने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलीस येत असल्याचे बघून हल्लेखोर तेथून पळून गेले.अनेक वेळा झाले होते वादआशिष वेल्डिंगचे काम करीत होता. पोलीस सूत्रांच्या मते आशिष पूर्वी गुन्हेगारीत लिप्त होता. त्याच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. आशिष नालंदानगर चौक परिसरातील वस्तीतून ये-जा करीत होता. वस्तीतील गल्ली अतिशय अरुंद असतानाही तो वेगाने दुचाकी चालवित होता. त्यामुळे अपघात होण्याची भीती होती. यापूर्वी आशिषसोबत बरेचदा वस्तीतील लोकांचा वाद झाला होता. तरीसुद्धा तो वेगाने दुचाकी चालवित होता.आरोपी खोटी माहिती देत आहेआशिषच्या कुटुंबीयांच्या मते आरोपी स्वत:ला वाचविण्यासाठी खोटी माहिती देत आहे. आशिषकडे अॅक्टीव्हा गाडी होती. गल्ली अरुंद असल्याने वेगाने गाडी चालविणे शक्यच नाही. नालंदानगर चौकात आशिषच्या मुली शिकवणीला जातात. मुलींना शिकवणीला पोहचवून देण्यासाठी तो गल्लीतून ये-जा करीत होता. आरोपींचा परिसरात दबदबा आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण दिले जात आहे. आशिषच्या कुटुंबीयाचे म्हणणे आहे की, त्याचा गुन्हेगारीशी कुठलाही संबंध नव्हता. आरोपींशी त्याचा थोडाफार वाद झाला होता. त्याच्या हत्येमध्ये अजूनही काही लोक सहभागी आहे.मुली झाल्या अनाथआशिषला दोन मुली आहे. तो एकटा मुलगा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई भंडाऱ्याला गावी गेली होती. घटनेपूर्वी तो पत्नीसोबत बाजार घेऊन आला होता. पत्नीने चहापत्ती संपली असल्याचे सांगितल्यामुळे तो घराबाहेर पडला होता. त्याच्या हत्येमुळे दोन्ही मुली अनाथ झाल्या आहे.
वेगाने दुचाकी चालविल्यामुळे नागपुरात युवकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:20 PM
वेगाने दुचाकी चालविल्यामुळे झालेल्या वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालंदानगर चौकात सोमवारी रात्री ही घटना घडली.
ठळक मुद्देशांतिनगरातील घटना : पाच आरोपी अटकेत