केळवद (नागपूर) : तरुणाने अनाेळखी व्यक्तीशी माेबाईल फाेनवर चॅटिंग केले. त्या व्यक्तीच्या सूचनेनुसार विशिष्ट संकेतस्थळावर त्याने त्याचा साेने खरेदी-विक्रीसाठी युझर आयडी तयार केला. याच गाेपनीय माहितीच्या आधारे अनाेळखी व्यक्तीने त्याच्या खात्यातील १० लाख ८ हजार ५०० रुपयांची उचल करून त्याची फसवणूक केली. ही घटना केळवद (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगसा येथे नुकतीच घडली.
विलास मुनीराज कमाले (३१, रा. मंगसा, ता. सावनेर) याने त्याच्या माेबाईल फाेनवर प्राप्त झालेल्या अनाेळखी व्यक्तीच्या व्हाॅट्सॲप क्रमांकावर चॅटिंग करायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने विलासचा विश्वास संपादन केल्यानंतर त्याला त्याच्या माेबाईल फाेनवर विशिष्ट लिंक पाठविली आणि त्यावर त्याचा युझर आयडी तयार करण्याची सूचना केली. विलासने अनाेळखी व्यक्तीवर विश्वास ठेवत, त्या संकेतस्थळावर स्वत:चा युझर आयडी तयार करून त्याला पासवर्डदेखील दिला. पुढे त्याने याच युझर आयडीचा वापर करीत साेन्याची खरेदी-विक्री करायला सुरुवात केली. या व्यवहारातून त्याच्या खात्यात काही रक्कम जमा झाली.
त्या अनाेळखी व्यक्तीने विलासचा युझर आयडी आणि पासवर्ड त्याच्याकडूनच जाणून घेतला. त्या गाेपनीय माहितीच्या आधारे त्याने विलासच्या खात्यातून आभासी लाभाचे १० लाख ८ हजार ५०० रुपये काढून घेत त्याची फसवणूक केली. ही बाब लक्षात येताच विलास कमाले याने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी केळवद पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम सहकलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास सावनेरचे ठाणेदार मारुती मुळूक करीत आहेत.