सावनेर/पाटणसावंगी : नागपूर शहरातील पाच तरुण मित्र शुक्रवारी (दि. १) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वाकी (ता. सावनेर) परिसरात फिरण्यासाठी आले हाेते. ते पाचही जण पाेहण्यासाठी कन्हान नदीतील डाेहात उतरले. त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला, अन्य एक अत्यवस्थ आहे, तर तिघे थाेडक्यात बचावले.
वृषभ दिनेश चांदेकर (२२) असे मृताचे नाव असून, नयन राजेंद्र रामटेके (२३) असे अत्यवस्थ असलेल्याचे तर प्रज्वल रूपचंद साखरे (१९), निखिलेश दांडेकर (२१) व आकाश पाटील (२४) अशी थाेडक्यात बचावलेल्या तरुणांची नावे आहेत. हे सर्वजण मित्र असून, नागपूर शहरातील अंगुली मालनगर, जरीपटका भागात राहतात. ते शुक्रवारी दुपारी वाकी दरबार परिसरात फिरायला आले हाेते. काही वेळाने ते दरबारच्या मागच्या भागाला असलेल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला गेले.
डाेहात पाणी दिसताच पाचही जणांनी पाेहण्याची याेजना आखली व पाेहायला सुरुवात केली. पाेहताना वृषभ खाेल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब लक्षात येताच नयन त्याला वाचविण्यासाठी पुढे सरसावला. परंतु, वृषभला वाचविण्यात नयनला यश आले नाही. उलट नाका-ताेंडात पाणी गेल्याने ताेच अत्यवस्थ झाला. उर्वरित तिघेही कसेबसे पाण्याबाहेर आले.
स्थानिक नागरिकांनी पाेलिसांना सूचना देत नयनला डाेहातून बाहेर काढले व वृषभचा शाेध सुरू केला. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून काही वेळाने वृषभचा मृतदेह डाेहाबाहेर काढला. नयनवर लगेच सावनेर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. वृषभचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर शहरात आणला. याप्रकरणी खापा (ता. सावनेर) पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.