नागपूर : आयफोन आणि शूज गिफ्ट म्हणून पाठविले, अशी थाप मारून सायबर गुन्हेगारांनी एका तरुणाला १५.६५ लाखांचा गंडा घातला.
राहुल बाळकृष्ण पराते (वय ३३) असे फसगत झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल धंतोली येथील एका क्लिनिकमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. नोव्हेंबर २०२१ ला त्याची कथित डॅनियल लिचर्ड नामक आरोपीशी ऑनलाइन ओळख झाली. आपण कॅलिफोर्नियात राहतो आणि ब्युटी कॉस्मेटिक्सचा व्यवसाय करतो, अशी थाप कथित डॅनियलने मारली. त्यानंतर तो राहुल सोबत सलग ऑनलाइन संपर्कात राहू लागला.
१६ नोव्हेंबरला डॅनियलने राहुलला फोन केला. आज माझा वाढदिवस असल्यामुळे मी चॅरिटी करीत आहो, तुला आयफोन आणि शूज पाठवीत आहो, अशी थाप त्याने मारली. त्यानंतर १६ नोव्हेंबरला दुपारी राहुलला फोन आला. कस्टम ऑफिसर बोलतो, असे सांगून सायबर गुन्हेगाराने विदेशातून गिफ्ट आले आहे. त्याची कस्टम ड्यूटी जमा करावी लागेल, असे सांगून १६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत वेगवेगळी कारणे सांगून आणि धाक दाखवून १५ लाख, ६५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले.
प्रत्येक वेळी पैशाची मागणी करणाऱ्या आरोपीला एवढी मोठी रक्कम देऊनही पुन्हा पुन्हा पैशाची मागणी होत असल्यामुळे राहुलने अखेर ‘गिफ्ट नको माझी रक्कम मला परत करा,’ असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी त्याच्याशी संपर्क तोडला. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यामुळे राहुलने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.