लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : नाल्यावरील कमी उंचीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना तरुणाने माेटारसायकलने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे ताे पुलाच्या मध्यभागी काेसळला व माेटारसायकलसह वाहत गेला. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसर (ता. रामटेक) नजीक आमडी शिवारात मंगळवारी (दि. १४) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
निकू घनश्याम बादुले (१८, रा. आमडी, ता. पारशिवनी) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. निकू नेहमीप्रमाणे त्याच्या माेटारसायकलने मनसर परिसतील धाब्यावरून सकाळी ६ वाजताच्या सुमारास आमडी येथे जायला निघाला हाेता. या परिसरात साेमवारी (दि. १३) मध्यरात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत मुसळधार पाऊस बरसल्याने या भागातील सर्व नदी, नाल्यांना सकाळी पूर आला हाेता.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान-मनसर दरम्यान आमडी परिसरातील उड्डाणपुलाच्या खालून वाहणाऱ्या नाल्यांलाही पूर आला हाेता. या नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने पुराचे पाणी पुलावरून वाहत हाेते. निकूने माेटारसायकलसह पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. ताे पुलाच्या मध्यभागी पाेहाेचताच पाण्याच्या वाहत्या प्रवाहामुळे त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला व ताे काेसळला. प्रवाहात आल्याने ताे माेटारसायकलसह वाहत गेला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून शाेधकार्य सुरू केले. पुलापासून काही अंतरावर त्याचा मृतदेह व माेटारसायकल आढळली, अशी माहिती पाेलिसांनी दिली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.
...
चक्का जाम आंदाेलन
या घटनेची माहिती मिळताच आमडी येथील संतप्त नागरिकांनी पारशिवनी -आमडी फाटा मार्गावर चक्का जाम आंदाेलन केले. पारशिवनीचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी लगेच आंदाेलनस्थळ गाठून नागरिकांशी चर्चा केली. या पुलाची उंची कमी असल्याने वारंवार वाहून जाण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगत उंच पूल बांधण्याची मागणी रेटून धरली. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून मार्ग काढण्याचे त्यांनी आश्वासन दिल्याने नागरिक शांत झाले. येत्या गुरुवारी (दि. १६) ही बैठक बाेलावल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी दिली.