लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : तालुक्यात सध्या लसीकरण सुरू आहे. परंतु सर्वच स्तरावर नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. त्यामुळे तरुणांनी लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.
१९ जूनपासून ३३ ते ४४ वयाेगटातील तरुणांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. यामध्ये रामटेक तालुक्यात फक्त ९५ तरुणांनी लसीचा पहिला डाेस घेतला आहे तर केवळ एकाने ४५ ते ६० वयाेगटातील लस टाेचून घेतली. दुसरा डाेस फक्त ४१ नागरिकांनी घेतला आहे.
जिल्ह्यात रामटेक तालुका हा लसीकरणाबाबतीत शेवटी आहे. अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी व तालुका आराेग्य अधिकारी यांची चमू लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु लसीकरणाबाबत इतक्या अफवा पसरलेल्या आहे की, तरुण वर्गदेखील लसीकरणासाठी पुढे येताना दिसत नाही. रामटेक तालुक्यात १९ लसीकरण केंद्र सुरू केले आहे. प्राथमिक आराेग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये ही सुविधा आहे. २१ जूनपासून १८ ते २९ वयाेगटातील लसीकरणाला सुरुवात हाेत आहे. यात तरुण वर्गाचा समावेश आहे. त्यामुळे तरुणांनाे लसीकरणाला पुढे या, असे आवाहन खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे यांनी केले आहे.