विविध भागातील अल्पवयीन मुली बेपत्ता
नागपूर : कपिलनगर, एमआयडीसी आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. तिघीही १७ वर्षांच्या आहेत.
कपिलनगरातील मुलगी सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कॉलेजच्या बहाण्याने घराबाहेर गेली. एमआयडीसीतील मुलगी शाळेत जाते, असे सांगून घरून निघून गेली तर नंदनवनमधील मुलगी शिकवणी वर्गाला जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर गेली. रात्र झाली तरी मुलगी घरी परत आली नाही. त्यामुळे संबंधित पालकांनी आपापल्या भागातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या तिघींनाही फूस लावून पळवून नेण्यात आले असावे, असा संशय आहे.
महिलेचा अकस्मात मृत्यू
नागपूर : जरीपटक्यातील नारी रोड गंगोत्री लॉनजवळ राहणाऱ्या ब्रजकुमारी किशनलाल उटका (वय२२) या महिलेची प्रकृती सोमवारी सकाळी बिघडली. तिला मेयोत दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मध्यरात्री डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.
खाप्यातील वसमाचा मृतदेह आढळला
नागपूर : सावनेर तालुक्यातील डोंगेघाट खापा येथील यशवंत शामरावजी पवार (वय ४६) हे सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास रेल्वेस्थानकाजवळ मृतावस्थेत आढळून आले. बंटी हेमंत सोनवाय (वय ३२) यांनी दिलेल्या माहितीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
---