प्रेमीयुगुलात वाद : महाराजबागेत आत्महत्येचा प्रयत्ननागपूर : जीवनसाथी बनण्याच्या तयारीतील प्रेमी युगुलात वाद झाल्यामुळे तरुणीने ब्लेडचे चिरे मारून हाताची नस कापून घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास महाराजबागमध्ये ही थरारक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.कळमेश्वर तालुक्यातील रोहिणी (वय २२) ही तरुणी आणि कृष्णा (वय २७) या दोघांचे साक्षगंध झाले आहे. एकमेकांचे जीवनसाथी बनण्याच्या तयारीत असलेले हे दोघे मंगळवारी सकाळी महाराजबागमध्ये आले. एका कोपऱ्यात बसून ते गप्पा करीत होते. अचानक त्यांच्यात वाद झाला आणि ते एकमेकांशी भांडू लागले. नेहमीचा प्रकार समजून आजूबाजूच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, तरुणीने आपल्या डाव्या हाताच्या मनगटाची ब्लेडने नस कापून घेतली. त्यानंतर तिचा आणि तिच्या प्रियकराचा आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. महाराजबागेतील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. त्यातील एकाने महाराजबागेचे डॉ. सुनील बावस्कर यांना तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती दिली. त्यानुसार डॉ. बावस्कर आणि डॉ. मोटघरे घटनास्थळी धावले. त्यांनी बेशुद्धावस्थेतील त्या तरुणीला आणि तिच्या प्रियकराला लगेच मेयोत नेले. तेथे डॉक्टरांनी औषधोपचार केल्यानंतर तरुणी शुद्धीवर आली. सीताबर्डी पोलिसांना मेयोच्या पोलीस बूथवरून ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी मेयोत धाव घेतली. मात्र. तोपर्यंत ती तरुणी आणि तो तरुण मेयोतून निघून गेले होते. पोलिसांनी डॉक्टरांकडून त्यांचे नाव, गाव, पत्ता नोंदवून घेतला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळपर्यंत हे दोघे ठाण्यात पोहचले नाही. त्यामुळे वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. (प्रतिनिधी)तिसरी घटना उपराजधानीतील विविध उद्यानांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत तरुण-तरुणींचे घोळके जमलेले असते. आडोसा पाहून बसलेली ही मंडळी असभ्य वर्तन करताना बघायला मिळतात. अनेक जोडप्यात वादही होताना दिसतो. आजची घटना तशातीलच एक आहे. महाराजबागेत तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याची ही अलीकडच्या दोन वर्षातील तिसरी घटना आहे. दोन वर्षांपूर्वी एका तरुणीने अशाच प्रकारे हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर, एकीने विष प्राशन केले होते. नस कापणारी बचावली. मात्र, विष घेतलेल्या तरुणीचा मृत्यू झाला होता.
तरुणीने कापली हाताची नस
By admin | Published: June 24, 2015 3:07 AM