लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - शासकीय कार्यालयात कार्यरत असलेली एक तरुणी शहिद गोवारी उड्डाण पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाली. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. ती अपघाताने पुलावरून पडली की तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, ते रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
तनवी मिलिंद आवळे (वय २६) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तनवीचे वडील सरकारी नोकरीत होते. त्यांच्या निधनानंतर तनवी अनुकंपा तत्वावर नोकरीला लागली. दीड वर्षांपासून ती शिपायी म्हणून कार्यरत होती. वडिलांच्या निधनानंतर तनवी तिच्या आई आणि भावासोबत ओंकारनगरात राहत होती. अतिशय सरळसाधी आणि शांत स्वभावाची म्हणून ती ओळखली जायची. नेहमीप्रमाणे गुरुवारी दिवसभर कार्यालयीन काम केल्यानंतर ती तिच्या दुचाकीने घराकडे निघाली. तिला चक्कर आला की आणखी काय झाले कळायला मार्ग नाही. सायंकाळी ६ च्या सुमारास सीताबर्डीतील पेट्रोल पंपाजवळ ती उड्डाण पुलावरून खाली पडली. ऑटोचालक आणि आजूबाजूच्या लोकांनी तिला लगेच पाणी पाजून बाजूलाच असलेल्या सीताबर्डी पोलिसांना कळविले. ठाणेदार अतुल सबनिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पोहचवले. दरम्यान, उड्डाण पुलावर तनवीची दुचाकी आणि बॅग होती. त्यात मोबाईलही होता. त्यावरून ओळख पटवून पोलिसांनी तनवीच्या नातेवाईकांना आणि कार्यालयीन वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी तिला खासगी इस्पितळात हलविले.
----
पायांना गंभीर दुखापत
उड्डाण पुलावरून पडल्याने तनवीच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाली आहे. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे तिच्या कार्यालयीन वरिष्ठांनी सांगितले आहे.
----