लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तवेरा चालकाने २८ हजार रुपये घेऊन त्यांना त्यांच्या मूळगावी न पोहचवता नागपुरात सोडून दिले. रखरखत्या उन्हात या तरुणी खांद्यावर बॅगा अडकवून फिरत होत्या. शहरातील नामवंत सेवाभावी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्या तरुणींना दिलासा दिला. त्यांची वास्तपुस्त केली आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या गावात सुखरूप पोहचवूनही दिले. माणुसकीची ‘मिसाल’ ठरावी असाच हा प्रकार आहे.गोंदिया, नागभीड आणि वर्धा जिल्ह्यातील आठ तरुणी अहमदाबाद (गुजरात) मधील एका कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये नोकरी करायच्या. लॉकडाऊनमुळे कंपनी बंद पडली. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने चालू महिन्याचे वेतन देऊन त्यांना कार्यमुक्त केले. काही दिवस काढल्यानंतर या तरुणींनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २३ मे रोजी अहमदाबादच्या एका तवेरा चालकास महाराष्ट्रात पोहोचवून देण्याची विनंती केली.कारचालकाने त्यांच्याकडून २८ हजार रुपये भाडे घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे मूळगावी न सोडता २५ मे रोजी भरदुपारी तरुणींना सीताबर्डीत सोडून दिले. तो निघून गेला. या तरुणी भटकू लागल्या. व्हेरायटी चौक परिसरात रखरखत्या उन्हात त्या तरुणी इकडून-तिकडे फिरत असल्याचे दिगंबर जैन परवार मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी विनय जैन यांना दिसले. त्यांनी त्यांना पाणी देऊन वास्तपुस्त केली. दोन दिवस प्रवास करून आलेल्या त्या तरुणी उपाशी होत्या. त्यांना नाश्ता खाऊ घातल्यानंतर जैन यांनी लगेच गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांना फोनवरून माहिती दिली. डॉ. भरणे यांनी लगेच यंत्रणा हलविली. त्यानंतर तरुणींना त्यांच्या त्यांच्या गावात पोहचविण्यासाठी ई-पास, मेडिकल सर्टिफिकेटही तयार करण्यात आले. जैन मंदिर ट्रस्टतर्फे विनय जैन आणि पोलीस प्रशासनाने जेवण, नाश्ता, पाणी आणि आवश्यक वस्तू सोबत देऊन प्रत्येकीला वेगवेगळ्या वाहनाने त्यांच्या गावी पोहचवण्यात आले.सेवा हाच धर्मअडचणीतील व्यक्तीला मदत करणे, त्यांची सेवा करणे हाच खरा धर्म असल्याची प्रतिक्रिया या संबंधाने अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. भरणे आणि जैन यांनी व्यक्त केली.
डोळ्यात आनंदाश्रू घेऊन घरी पोहोचल्या त्या तरुणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 10:25 PM
तवेरा चालकाने २८ हजार रुपये घेऊन त्यांना त्यांच्या मूळगावी न पोहचवता नागपुरात सोडून दिले. रखरखत्या उन्हात या तरुणी खांद्यावर बॅगा अडकवून फिरत होत्या. शहरातील नामवंत सेवाभावी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्या तरुणींना दिलासा दिला. त्यांची वास्तपुस्त केली आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना त्यांच्या वेगवेगळ्या गावात सुखरूप पोहचवूनही दिले. माणुसकीची ‘मिसाल’ ठरावी असाच हा प्रकार आहे.
ठळक मुद्देगुजरातमधून निघाल्या, मध्येच अडकल्या : नागपूरने दिला माणुसकीचा हात