लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - तरुणीचा विनयभंग करून तिच्या भावाला मारहाण करणाऱ्या एका आरोपीला गुरुवारी जरीपटका पोलिसांनी अटक केली. शुभम प्रकाश टेंभूर्णे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. तो इंदोरा झोपडपट्टी, पाण्याच्या टाकीजवळ राहतो.
तरुणीने (वय २०) दिलेल्या तक्रारीनुसार, २३ मेच्या सायंकाळी ६ वाजता तो तिच्या घरासमोर आला. अश्लील शिवीगाळ करून त्याने मारण्याची धमकी दिली आणि पळून गेला. त्यानंतर ३० मेच्या रात्री ८ वाजता सदर तरुणी तिच्या भावासोबत आईसक्रीम खाण्यासाठी जात असताना आरोपी टेंभूर्णेने तिला रस्त्यात अडवून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन केले. तिने आणि तिच्या भावाने विरोध केला असता आरोपीने तरुणीच्या भावाला मारहाण केली. आजूबाजूची मंडळी गोळा झाल्याने आरोपी पळून गेला. दरम्यान, आरोपीचा त्रास वाढतच असल्यामुळे तरुणीने गुरुवारी या संबंधाने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी टेंभूर्णेविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.