नागपूर : प्रेमसंबंधात लग्नाचे आमिष दाखवून मर्यादा ओलांडल्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीने स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिले. नागपूर - दिल्ली रेल्वेलाईनवर काटोलजवळ ही घटना घडली. तरुणीच्या आत्महत्येला प्रियकराची दगाबाजीच कारणीभूत असल्याचे उघड झाल्याने नागपूर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ईरफान अली (वय २८) याला अटक केली.
आरोपी इरफान आणि ती तरुणी काटोलमध्ये शेजारी-शेजारीच राहत होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर मोबाईलच्या माध्यमातून ते निरंतर एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. दोघांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या. त्यांचे एकत्र सोबत फिरणे परिसरात चर्चेचा विषय झाले होते. मात्र, लग्न करणार असल्याचे दोघांकडूनही सांगितले जात असल्याने यावर कुणी फारसा आक्षेप घेत नव्हते. दरम्यान, दोन-अडीच वर्षे निघून गेल्यानंतर तिने ईरफानमागे लग्नासाठी तगादा लावला होता. तर, तो तिला अलिकडे वेगवेगळे कारण सांगून टाळू लागला होता. ४ मे रोजी तिने त्याला लग्नासाठी विचारले असता त्याने लग्नास नकार दिला. प्रियकराची दगाबाजी आणि नकार जिव्हारी लागल्याने तरुणी खचली. तिने ४ मे च्या रात्री घर सोडले आणि रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्युची नोंद केली होती.
दरम्यान, तरुणीच्या मृत्युला तिचा दगाबाज प्रियकर इरफान अलीच कारणीभूत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. तशी तक्रारही नोंदवली. पोलिसांच्या चाैकशीतही तरुणीच्या आत्महत्येस इरफानच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात भादंविच्या कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल, आरोपी फरारगुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच ईरफान फरार झाला. पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला मानकापूर परिसरात अटक केली. एक दिवसाच्या पीसीआरनंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. रेल्वेचे पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मनीषा काशीद तपास करीत आहेत.