आपली बसचा गल्ला खालीच! ()
प्रवासी मर्यादेमुळे तोटा : दिवाळीनंतरही १५८ बस रस्त्यावर : २० हजार प्रवासी करतात प्रवास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊन आधी शहरात दररोज ३६० ते ३६५ बस रस्त्यावर धावत होत्या. दररोज दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. लॉकडाऊनमध्ये बस धावणे बंद होते. ऑक्टोबरमध्ये १०९ बस रस्त्यावर धावू लागल्या. तर दिवाळीनंतर १५८ बस धावत असून २० हजार प्रवासी प्रवास करतात. ५० टक्के प्रवासी क्षमतेने बससेवा सुरू आहे. कोरोनामुळे प्रवाशांचाही अपेक्षित प्रतिसाद नसल्याने दररोज तिकिटातून ४ ते ५ लाख उत्पन्न होत असल्याने आपली बसचा गल्ला खालीच आहे.
दिवाळीआधी १०८ बस सुरू होत्या. अर्थातच आताच्या तुलनेत उत्पन्न कमी होते. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता ५० टक्के प्रवासी वाहतूक करण्याला परवानगी आहे. खर्च मात्र कायम असल्याने बसचा तोटा वाढला आहे.
....
आपली बसची संख्या-३६५
पूर्ण बस सुरू असताना प्रवासी १.५० लाख, उत्पन्न २० लाख
धावत असलेल्या बस - १५८ धावत असताना २० हजार प्रवासी,
तिकिटातून दररोज उत्पन्न- ४ ते ५ लाख
......
फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता फिजिकल डिस्टन्स व मास्कचा वापर आवश्यक आहे. प्रवासी मास्कचा वापर करतात. परंतु सायंकाळी, सकाळी ९ ते १० दरम्यान बसमध्ये चढताना फिजिकल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
....
ऑटोच्या तुलनेत भाडे कमी
आपली बसचे भाडे टप्प्यानुसार आकारले जाते. पहिल्या टप्प्यात दहा रुपये त्यानंतर त्यात वाढ केली जाते. सर्वाधिक लांब अंतरासाठी ५३ रुपयांपर्यंत भाडे आकारले जाते. तर ऑटोने प्रवास प्रवास करावयाचा झाल्यास पहिल्या टप्प्याला १५ रुपये त्यानंतर ऑटोचालकाच्या मर्जीनुसार अंतर लक्षात घेता ५०, १०० रुपये वा त्याहून अधिक भाडे आकारले जाते.
.....
प्रवास भाडे बस रिक्षा
महाराजबाग ते बेसा २४ ५०
सीताबर्डी ते पिपला फाटा २४ ५०
सीताबर्डी ते स्वामीनारायण मंदिर २० ६०
जरीपटका ते सोनेगाव ३८ १००
पंचशील ते टाकळघाट ५३ १५०