लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डीसीएचसी, तथा डीसीएच बंद करण्याचे आदेश १७ जून रोजी आरोग्य विभागाने दिलेत. शासनाकडे ही यंत्रणा चालविण्यासाठी निधी नसल्याची ‘कुरबुरी’ समोर येत आहे. कोरोनामुळे असंख्य कुटुंबे रस्त्यावर आलीत. कमावत्या असंख्य हातातून नोकरी गेली. दोनवेळच्या भाकरीचेही अनेकांचे वांदे झाले. अशावेळी शासकीय स्तरावर सुरू असलेली आणि परवडणारी कोविड सेंटर बंद करणे, ही बाब नागरिकांची झोप उडविणारीच ठरत आहे. आरोग्यसेवेसाठी शासनाकडे निधी नाही, या कारणामुळे जर कोविड सेंटर बंद होत असतील तर ‘तुमचा खिसा रिकामा अन् आमचा खिसा भरून आहे काय?’ असा संतापजनक सवाल नागरिक शासनकर्त्यांना करीत आहेत.
उमरेड परिसरात आरोग्य यंत्रणा कमकुवत असतानाही केवळ कोविड सेंटर आणि कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या भरोशावर हजारो रुग्णांचे प्राण वाचले. उमरेडच्या कोविड सेंटरची जबाबदारी तीन डॉक्टर, १३ परिचारिका, वॉर्ड बाय आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच यथोचित सांभाळली. एकीकडे लाखो रुपयांचे बिल भरून औषधोपचार घेणारे रुग्ण होते. अनेकांना बेडही मिळाले नाही. ऑक्सिजनअभावी अनेकजण मृत्युमुखी पडले. रेमडेसिविर आणि अन्य औषधांचा काळाबाजारसुद्धा चव्हाट्यावर आला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागाही मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या संपूर्ण भीतीदायक वातावरणाचा लाभ काही खासगी रुग्णालयांनी आपल्या पदरात पाडून घेतला.
अशा विपरीत परिस्थितीतसुद्धा कोविड सेंटरमध्ये सर्वसामान्य, गोरगरीब वा श्रीमंत कुणालाही पैसा लागला नाही. शासकीय कोविड सेंटर अचानकपणे बंद करण्याचा सपाटा सर्वत्र सुरू आहे. काही बंद झालीत. काही बंद होण्याच्या वाटेवर आहेत. अशातच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास आरोग्य यंत्रणेची दमछाक होईल, एवढे नक्की. आधीच नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली असतानाच कोविड सेंटर बंद करणे यावर टीका केली जात आहे.
-------------------------------------------------------
परिचारिका बनल्या ‘स्वयंपाकी’
कोरोना रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी पोटाला चिमटा देत कंत्राटी अधिकारी-कर्मचारी कोविड सेंटरमध्ये रात्रंदिवस झटत होते. रुग्णांसाठी आटापिटा करीत होते. अतिशय कमी मानधनावर त्यांनी ही सेवा प्रदान केली. अशातच सक्रिय रुग्णसंख्या कमी झाल्याच्या कारणावरून आपणास कार्यमुक्त करीत असल्याचे आदेश या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हातात पडले. अशातच रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धडपडणारे हे हात सोमवारी रात्री शासकीय कार्यालयासमोर ‘स्वयंपाकी’ बनले होते. कार्यमुक्तीचा आदेश ही बाब आमच्यासाठी चटके लावणारी असून शासनाने तातडीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कंत्राटी अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचा आदेश मिळाल्यानंतर संताप व्यक्त करीत ठिय्या आंदोलनात सहभागी होत परिचारिका चक्क स्वयंपाकी बनल्या. निर्णयाचा निषेध नोंदविला.