लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खासगी नोकरीत मिळत असलेल्या पैशातून कुटुंब चालविणे कठीण होते. परंतु नाभिक समाजातील युवकांनी कोणतीही नोकरी न पत्करता आपला पारंपरिक व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराची कास धरली आहे. समाजातील ९५ टक्के युवक सलूनचा व्यवसाय करीत असून, केवळ ०.२ टक्के युवकच नोकरी करीत आहेत.आधुनिक काळात शासकीय नोकरीसाठी सर्वजण धडपड करतात. परंतु शासनाने नोकर भरती बंद केल्यामुळे अनेक जण खासगी नोकरीकडे वळतात. खासगी नोकरीतही ७ ते ८ हजार रुपयांच्यावर वेतन मिळत नाही. परंतु नाभिक समाजातील युवकांनी खासगी नोकरी पत्करण्याऐवजी आपल्या पारंपरिक व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. नागपुरात नाभिक समाजाची लोकसंख्या २ लाख २० हजार आहे. समाजातील २० हजार युवक सलूनच्या व्यवसायात असून, शहरात ६,५०० सलून असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य सचिव माधव चन्ने यांनी दिली. सलून व्यवसायात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. अत्याधुनिक मशीनचा समावेश झाला आहे. या व्यवसायात अनेक कॉर्पोरेट कंपन्या उतरल्या आहेत.दाढी, कटिंगपुरता हा व्यवसाय शिल्लक राहिला नाही. या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन अधिक उत्पन्न मिळविता येत असल्यामुळे, नाभिक समाजातील युवक अत्याधुनिक प्रशिक्षण घेऊन सलूनचा व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तुटपुंज्या पगाराची नोकरी न करता स्व:तचा व्यवसाय सुरू करण्यास युवक पसंती देत आहेत.
कौशल्य विकास कार्यक्रमातून मार्गदर्शनमहाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नागपुरात नाभिक समाजातील युवकांना सलूनच्या व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी हॉल किरायाने घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. सुरुवातीला ३० विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली. सद्यस्थितीत विदर्भासह इतर ठिकाणांवरून येणाऱ्या ३५० जणांना कौशल्य विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेऊन नाभिक समाजातील असंख्य युवकांनी सलूनचा व्यवसाय सुरू केला आहे.
सलून व्यवसायालाच युवकांची पसंती‘आधुनिक काळात शासकीय नोकऱ्या मिळणे कठीण झाले आहे. खासगी नोकऱ्यातही खूप कमी वेतन मिळते. यामुळे कुटुंबाचे पालनपोषण करणे शक्य होत नाही. त्यामुळे नाभिक समाजातील युवक सलूनचा व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगाराकडे वळत आहेत.’-माधव चन्ने, राज्य सचिव, महाराष्ट्र नाभिक महामंडळ