नागपूर : कंपनीत एकत्र काम करताना झालेल्या परिचयाचा फायदा घेऊन नागपुरातील एका बेरोजगार तरुणाने मुंबईतील प्राध्यापक तरुणीसोबत दुसरे लग्न करून तिची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.कमलेश अशोक राऊत (३३) रा. विश्वकर्मानगर गल्ली नं. १० अजनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कमलेश आणि पीडित ३५ वर्षीय पारुल (बदललेले नाव) मिहानच्या एका कंपनीत काम करीत होते. पारुल तेथे अधिकारी होती. तर कमलेश ड्रायव्हर होता. त्यानंतर मुंबईच्या एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी लागल्यामुळे पारुल मुंबईला गेली. दरम्यान कमलेश बेरोजगार झाला. कौटुंबिक कारणामुळे पारुलचा तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला. ती एकटीच मुंबईत राहत होती. पारुलबाबत माहिती कळताच कमलेशने तिला फसविण्याची योजना तयार केली. त्याने पारुलची भेट घेऊन आपण विद्युत विभागात कर्मचारी असल्याचे सांगितले अन् लग्नाचा प्रस्ताव तिच्या समोर ठेवला. घटस्फोटित असल्यामुळे आणि कमलेश अविवाहित असल्याचे पाहून तिने लग्नासाठी होकार दिला. त्यांनी जून २०१९ मध्ये जगनाडे चौकातील गायत्री मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्न केले. दोघेही मुंबईला गेले. कमलेशने संपत्ती खरेदी करण्याच्या नावाखाली पारुलकडून ६.६७ लाख रुपये घेतले आणि तो विमान प्रवास आणि दुसरे शौक करू लागला.
पहिल्या लग्नाचा भांडाफोड झालालॉकडाऊनमुळे कॉलेज बंद झाले पारुल नागपूरला आईवडिलांकडे आली. कमलेशही नागपूरला आला. मुंबईला जाण्याचे कारण सांगून १.९५ लाखाचे दागिने घेऊन निघून गेला. काही दिवसानंतर पारुलला कमलेशच्या वागणुकीत बदल झाल्याचे लक्षात आले. तिने मित्राला फोन करून त्याची पुष्टी करण्याबाबत सांगितले. त्याने कमलेश मुंबईत नसल्याचे सांगितले. पारुल सतर्क झाली. कमलेशच्या घरी गेल्यानंतर तिने त्याला पत्नी आणि मुलांसोबत रंगेहात पकडले. पहिल्या पत्नीनेही तो ऐशोआरामाचा शौकिन असल्याचे सांगितले. त्यानंतर पारुलने कोतवाली ठाण्यात तक्रार दाखल केली.