नागपूर : सट्टा लावण्याच्या नादात कर्जबाजारी झालेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी दुपारी ३ ते ४.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रशांत प्रवीण सरकार (२५, ओमसाईनगर, कोराडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रशांत कोराडी नाक्यावरील एका हॉटेलमध्ये सुपरवायझरची नोकरी करीत होता. प्रशांतला सट्टा लावण्याची सवय होती. यामुळे तो कर्जबाजारी झाला.
काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला ९० हजार रुपये दिले होते. त्यानंतरही तो घरी पैशांची मागणी करीत असल्यामुळे त्याच्या आईने प्लॉट गहाण ठेवून त्याला पैसे देण्याची तयारी दर्शवली होती. प्रशांतची आई पोद्दार शाळेच्या स्कूल बसमध्ये काम करते.
शनिवारी दुपारी ३ ते ४.३० दरम्यान प्रशांतने आपल्या राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. त्याची आई दुपारी घरी आल्यानंतर तिने दार वाजविले असता आतून कोणीच प्रतिसाद दिला नाही. तिने खिडकीतून आत डोकावले असता प्रशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. प्रवीण फनिंद्रनाथ सरकार यांनी दिलेल्या सूचनेवरून कोराडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास उपनिरीक्षक नरेंद्र रत्नापुरे करीत आहेत.