लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑनलाईन गेमच्या नादातून नैराश्य आल्यामुळे जयताळ्यात राहणाºया एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. सुभाष अनंतराव मानेश्वर (वय १८) असे मृत युवकाचे नाव आहे. तो सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा मार्गावर आनंद नगरात राहत होता.मूळचा मध्य प्रदेशमधील रहिवासी असलेला सुभाष त्याच्या आईवडिलांसह काही वर्षांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आला होता. त्याचे आईवडील मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार, सुभाषला मोबाईलवर आॅनलाईन गेम खेळण्याचा नाद लागला होता. ‘पब जी’सारख्या गेममध्ये तो तासन्तास मोबाईलमध्ये गुंतून राहायचा. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे काम धंदे बंद असल्याने तो घरीच राहायचा. सकाळपासून तो मध्यरात्रीपर्यंत सुभाष मोबाईलमध्ये गुंतून असल्याने त्याला खाण्यापिण्याचेही भान राहत नव्हते. रविवारी रात्री ७.३० च्या सुमारास त्याचे आईवडील बाजारात भाजीपाला आणायला गेले. त्यावेळी देखील सुभाष मोबाईलमध्ये गुंतून होता. भाजी घेऊन रात्री ८.३९ च्या सुमारास ते परतले. तेव्हा सुभाष सिलिंग फॅनला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. आईवडिलांनी आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी गोळा झाले. त्यांनी सोनेगाव पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्याचे शव मेडिकलमध्ये रवाना करण्यात आले.सुभाषने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, ते जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या खोलीत तपासणी केली. मात्र, त्याने कोणती चिठ्ठी वगैरे लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळले नाही. सुभाषने ‘पब-जी’ किंवा अशाच गेमच्या नादात आत्मघात केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. सुभाषचे वडील अनंत मानेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.