ठळक मुद्देपोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत आयोजित महाराष्ट्र महापौर परिषदेच्या आयोजनस्थळासमोर शनिवारी सकाळी युवक कॉंग्रेस व आम आदमी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. शहरातील विकासप्रकल्प अयशस्वी झाले असतानादेखील त्यांना यशस्वी दाखवून स्वत:चेच कौतुक करून घेण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.‘आप’तर्फे सकाळी परिषदेच्या उद्घाटनापूर्वी ‘वनामती’समोर आंदोलन करण्यात आले. महापौर परिषद ही खोट्या विकास कामांची शिकवणी देणारी परिषद आहे, असे फलक घेऊनच ‘आप’चे कार्यकर्ते प्रवेशद्वारावर उभे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर काही वेळाने युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव अजित सिंह व उपाध्यक्ष धीरज पांडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना, ग्रीन बस, सिमेंट रस्ते इत्यादी प्रकल्प अयशस्वी झाले आहेत. मनपाची आर्थिक स्थिती खालावली असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला. वनामतीसमोर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. अखेर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.