नागपुरात महामेट्रोत पदभरती घोटाळ्याविरोधात युवक काँग्रेस आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 09:19 PM2021-09-09T21:19:06+5:302021-09-09T21:21:43+5:30
Nagpur News नागपूर मेट्रोमध्ये पदभरती करताना एस.सी., एस.टी, ओबीसींचे आरक्षण डावलून खुल्या संवर्गातून अधिकची पदभरती करण्यात आली, असा आरोप करीत प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी महामेट्रो कार्यालयाला घेराव घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर मेट्रोमध्ये करण्यात आलेल्या पदभरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे. पदभरती करताना एस.सी., एस.टी, ओबीसींचे आरक्षण डावलून खुल्या संवर्गातून अधिकची पदभरती करण्यात आली, असा आरोप करीत प्रदेश युवक काँग्रेसने गुरुवारी महामेट्रो कार्यालयाला घेराव घातला. यावेळी महामेट्रोचे प्रवेशद्वार बंद असल्यामुळे कार्यकर्त्यांनी गेटवर चढून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. (Youth Congress aggressive against Mahametro recruitment scam in Nagpur)
युवक काँग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्यासह युवक काँग्रेसचे सचिव अतुल मल्लेलवार, अक्षय हेटे, रौनक चौधरी, संदीप देशपांडे, कुणाल पेंदोरकर, पिंकू बावने, स्वप्निल घोसे, कल्पक मुप्पीडवार, विशाल भगत, सुमित पाठक, संकेत हांडे, सुशांत लोखंडे, सारंग जांभुडे, नितीन दुवावार, कमलेश खोब्रागडे, सागर सोनटक्के, अरविंद भोपये, आदींनी महामेट्रोच्या कार्यालयावर धडक दिली.
खुल्या संवर्गाची ३५७ पदे असताना तब्बल ६९० पदे भरण्यात आली. पदभरतीत मागासवर्गीयांचे आरक्षण डावलण्यात आल्याचा आरोप करीत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवानी वडेट्टीवार यांनी केली. महामेट्रोने मुख्य द्वार बंद करून ठेवले होते. आंदोलकांनी त्यावर चढून कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी त्यांना रोखले. शेवटी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेण्याची परवानगी शिष्टमंडळाला देण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने निवेदन देत चौकशी करण्याची मागणी केली.
दरम्यान, एनएसयूआयचे कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले. एनएसयूआयचे नागपूर जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांनी मेट्रो प्रवासात विद्यार्थ्यांना ५० टक्के सवलत देण्याची मागणी केली. ११ सप्टेंबरपर्यंत यावर निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अधिकार रॅली काढण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सचिव बंटी शेळके, अजित सिंह, इरशाद शेख, आदी उपस्थित होते.