नागपूर : टाटा समुहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला नेण्यात आल्याच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीवर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते धडकले. प्रवेशद्वारावर ‘एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री गुजरात’ अशी पाटी लावण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संबंधित पाटी हिसकावत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्त्वात सायंकाळी ५.३०च्या सुमारास युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रामगिरीच्या प्रवेशद्वारासमोर जमले. कार्यकर्त्यांच्या हातात विमानाचे कटआऊट होते. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात सुरूवात केली. आंदोलनाची आधीच भनक लागली असल्यामुळे तगडा पोलीस बंदोबस्त होता. कार्यकर्त्यांनी रामगिरीच्या दिशेने आगेकूच करताच पोलिसांनी धरपकड सुरू केली. कुणाल राऊत यांच्यासह सुमारे २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे हे खोके मुख्यमंत्री असून, ते महाराष्ट्राऐवजी गुजरातसाठी काम करीत असल्याची टीका यावेळी कुणाल राऊत यांनी केली.