युवक काँग्रेसचा वाद पेटला, कुणाल राऊत हटावसाठी दिल्लीवारी
By कमलेश वानखेडे | Updated: January 21, 2025 14:55 IST2025-01-21T14:54:29+5:302025-01-21T14:55:09+5:30
कारवाई झालेले पदाधिकारी आक्रमक : राष्ट्रीय अध्यक्ष व प्रभारींकडे तक्रार करणार

Youth Congress controversy erupts, Kunal Raut goes to Delhi to get rid of him
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संघ मुख्यालयावरील मोर्चात सहभागी न झाल्याचे कारण देत प्रदेश युवक काँग्रेसने ६० पदाधिकाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. कारवाई झालेल्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला असून युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनाच तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्याची मागणी राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय प्रभारी यांच्याकडे केली जाणार आहे.
युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, महासचिव शिवानी वडेट्टीवार, केतन ठाकरे, अनुराग भोयर, मिथिलेश कन्हेरे, अक्षय हेटे यांच्यासह ६० जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईने संबंधित पदाधिकारी कमालीचे दुखावले आहेत. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत कुणाल राऊत यांना मतदान न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना ते ठरवून टार्गेट करीत असल्याचा गंभीर आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. युवक काँग्रेस हे पक्षाचे संघटन आहे. ही कुणाची प्रायव्हेट लि. कंपनी नाही. त्यामुळे संघटनेचे काम नियमानुसार चालायला हवे. आंदोलनाची माहिती अगदी एक दिवसापूर्वी देण्यात आली. कुणाचे वडिल, कुणाची आई तर कुणाची पत्नी हॉस्पीटलमध्ये भरती होती. पदाधिकारी आंदोलनात अनुपस्थित होते तर संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागायला हवे होते. त्यावर समाधान झाले नाही तर कारवाई करायला हवी होती. मात्र, तसे न करता केवळ राजकीय आकसापोटी कार्यमुक्तची कारवाई करण्यात आली. ही सर्व बाजू आता कारवाई झालेले पदाधिकारी दिल्लीत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानु चिब व राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अल्लावेरु यांच्याकडे मांडणार आहेत.
बंटी शेळके यांनाही सूचना नाही
बंटी शेळके हे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आहेत. ते विधानसभा निवडणूक लढलेल्या मतदारसंघात हे आंदोलन होते. मात्र, केवळ क्रेडिट घेण्यासाठी त्यांनाही या आंदोलनाची पूर्वकल्पना देण्यात आली नाही, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
९ महिन्यांपासून प्रदेशची बैठक नाही
कुणाल राऊत हे युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. अध्यक्ष म्हणून गेल्या ९ महिन्यांपासून त्यांनी प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेतलेली नाही. राऊत हे निष्क्रीय असल्यामुळे त्यांनाच तत्काळ पदमुक्त करावे, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.
प्रियंका गांधींच्या ‘रोड शो’ला दांडी का ?
विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या राष्ट्रीय महसाचिव प्रियंका गांधी यांचा पश्चिम नागपूर व मध्य नागपुरात ‘रोड शो’ला आयोजित करण्यात आला होता. कुणाल राऊत हे नागपुरात असूनही या ‘रोड शो’ मध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना याचा जाब विचारण्यात यावा, अशीही पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.