सुमेध वाघमारे
नागपूर : विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसºया दिवशी युवक काँग्रेसने काढलेला मोर्चा आक्रमक झाला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील केदार, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस बंटी शेळके, शिवानी वडेट्टीवार यांनी कठड्यांवर चढून विधान भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी पटोले यांच्यासह राऊत, शेळके, वडेट्टीवार यांना बळाचा वापर करीत अक्षरश: उचलून नेऊन वाहनात कोंबले.
अखिल भारतीय युवक काँग्रसेच्यावतीने बेरोजगारी, अवकाळीच्या संकटात सापडलेला शेतकरी, पेपर फुटी प्रकरणातील चौकशी यासह इतरही मागण्यांसाठी शुक्रवारी दुपारी अंजुमन कॉलेज मंगळवारी कॉम्प्लेक्सयेथून विधी मंडळावर मोर्चा काढण्यात आला. सुनील केदार, कुणाल राऊत, युवक बंटी शेळके, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा पोलिसांनी लिबर्टी टॉकीज चौकात कठडे लावून अडविला. त्याचवेळी केदार यांच्यासह राऊत, बंटी शेळके, वडेट्टीवार यांच्यासह काही कार्यकर्ते कठड्यांवर चढले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाजी सुरू केले. कठडे ओलांडणाºया कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरू केली. त्याचवेळी राऊत, शेळके, वडेट्टीवार यांनी कठड्यावरून खाली उडी मारताच पोलिसांनी त्यांना उचलून नेले.
दरम्यान नाना पटोले हे सुद्धा कठड्यांवर चढले. यामुळे कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. पटोले यांनी कठडे ओलांडून रस्त्यावर ठाण मांडून बसले. पोलिसांनी त्यांचे दोन्ही हात-पाय पकडून, उचलून घेत पोलिसांच्या वाहनात बसविले. मोर्चा आक्रमक झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मोर्चातील सर्व प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काही वेळातच मोर्चा माघारी फिरला. मोर्चाला आ. विकास ठाकरे, अक्षय जैन यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
- बेरोजगार तरुणांचा हा आक्रोश-पटोले
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, हा आक्रोश बेरोजगार तरुणांचा आहे. सरकारने महाभरतीच्या नावाने आॅनलाईन पद्धतीने तरुणांना लुटले. तरुणाईला बरबाद करण्याचे काम हे सरकार करीत आहे. महाराष्ट्रात लाखो पदे रिक्त आहेत. परंतुकंत्राटी भरतीच्या नावाने ते तरुणांचे आयुष्य बरबाद करीत आहेत. सरकारला याचं उत्तर द्यावे लागेल. हे चीटफंडवाले सरकार आहे. त्यामुळे तरुणांचा उद्रेक होणं साहजिक आहे. शिकलेल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही कठेडेच काय सरकारच्या भिंती तोडून त्यांच्या छातडावर बसून न्याय मिळवून देऊ, असेही पटोले म्हणाले.