नागपूर : भाजपकडे बोलणाऱ्या नेत्यांची तगडी फौज आहे. युवा नेतेही अभ्यासू व आक्रमक आहेत. यांच्यापुढे काँग्रेस नेत्यांचा अभ्यास व वक्तृत्व कमी पडते, असे विविध प्रसंगी पहायला मिळते. आता यावर उपाय म्हणून युवक काँग्रेस पक्षासाठी प्रवक्त्यांचा शोध घेेण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेत निवड होणाऱ्या युवकांना काँग्रेसची ध्येय, धोरणांचे धडे देऊन विरोधकांचा सामना करण्यासाठी तयार केले जाणार आहे.
सोमवारी अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव बंटी शेळके, प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार, राष्ट्रीय प्रवक्ता संजीव शुक्ला, प्रदेश प्रवक्ता कपील ढोके, कृष्णा तवले, जिल्हाध्यक्ष राहुल सिरिया, शहर अध्यक्ष तौसिफ खान आदींनी पत्रकार परिषद घेत या उपक्रमाची माहिती दिली. अ.भा. युवक काँग्रेसतर्फे देशभरात ‘यंग इंडिया के बोल’ ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशा तीन पातळींवर होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक गुगल फॉर्म जारी करण्यात आला आहे. १ ऑक्टोबरपर्यंत स्पर्धेसाठी नाव नोंदणी करता येईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हास्तरीय स्पर्धा होईल. त्यातून पाच वक्त्यांची राजस्तरासाठी निवड होईल. राज्यस्तरीय विजेत्यांना १४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करायला मिळेल. विजेत्या स्पर्धकांना युवक काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतून प्रवक्ते निवडण्याची ही पक्षाची पहिलीच वेळ आहे.