नागपूर :एसटी महामंडळातर्फे प्रवासी आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहे. वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. असाच एक प्रयोग शहरातील मुख्य गणेशपेठ बसस्थानकावर 'सेल्फी पॉईंट'च्या रुपात करण्यात आला असून तो प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्याने त्याला तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या दोन वर्षांत कोरोना आणि नंतर संपाचा फटका बसल्यामुळे एसटीचे कंबरडे मोडल्यासारखे झाले होते. प्रवासी दुरावल्याने एसटीची आर्थिक स्थिती कमालीची कमकुवत झाली होती. सरकारच्या आर्थिक पाठबळावर एसटीची वाटचाल सुरू असतानाच जास्तीत जास्त प्रवासी आणि मालवाहू भाडे मिळवण्यासाठी महामंडळाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. सरकारचीही त्यात साथ मिळत आहे.
नुकतीच महिला सन्मान योजना एसटीत सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना प्रवासाचे केवळ ५० टक्केच भाडे द्यावे लागत असल्याने महिला प्रवाशांची संख्या दोनच दिवसांत १५ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर गेली आहे. उत्पन्नही वाढले आहे. याने हुरूपलेल्या नागपूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी आता प्रवाशांना आकर्षित करणारा नवा प्रयोग गणेशपेठ बसस्थानकावर केला. येथे प्रवाशांसाठी अत्यंत आकर्षक असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला.
विभाग नियंत्रक प्रल्हाद घुगे, सुरक्षा अधिकारी धम्मरत्ना डोंगरे, विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे यंत्र अभियंता निलेश धारगावे, विलास पाध्ये आणि विभागीय कार्यशाळेतील कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन हा सेल्फी पॉईंट तयार केला आहे. त्यात वरच्या भागात डिजिटल बोर्डवर बसेस धावत असल्याचा भास होतो आहे. तर, खाली गुळगुळीत मार्गावर शिवाई बस दिसते आहे. बाजुलाच पुष्पगुच्छ भरलेला पॉईंट असून शिवाईच्या बाजुला उभे राहून प्रवासी सेल्फी काढू शकतात. या सेल्फी पॉईंटला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. खास करून तरुण मुला-मुलींच्या सेल्फी काढण्यासाठी उड्या पडत असून गेल्या दोन दिवसांत शेकडो प्रवाशांनी सेल्फी काढून घेतली आहे.