लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून काहींनी दुचाकीने जात असलेल्या तरुणावर आकस्मिक हल्ला चढविला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची भरदिवसा निर्घृण हत्या केली. ही घटना कामठी शहरातील समतानगर भागात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.सौरभ सिद्धार्थ सोमकुवर (१८, रा. लुंबिनीनगर, कामठी) असे मृताचे नाव आहे. सौरभ हा कामठी शहरातील गोयल टॉकीज परिसरात असलेल्या एका फोटो स्टुडिओमध्ये काम करायचा. प्रकृती खराब असल्याने तो मागील काही दिवसांपासून कामावर गेला नव्हता. दरम्यान, त्याने मंगळवारी दुपारी वडील सिद्धार्थ यांना एमएच-४०/एवाय-५९९३ क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने बसस्थानक परिसरात सोडले आणि त्याच अॅक्टिव्हाने भुयारी पूलमार्गे घराकडे जाण्यास निघाला. तो समतानगरात पोहोचताच तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढविला. त्यांनी सौरभच्या गळा, छाती, पोट व पाठीवर धारदार शस्त्राने एकूण १६ वार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तो खाली कोसळताच आरोपींनी तिथून पळ काढला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याबाबत कळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तिथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार संतोष बकाल करीत आहेत.गुन्हेगारी पार्श्वभूमीसौरभचा भाऊ सूरज हा चोरी करायचा. चोरीच्या प्रकरणात तो सध्या नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात आहे. मोबाईल चोरी प्रकरणात मोबाईलमध्ये आढळलेल्या सीमकार्डची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सौरभला विचारपूस करण्यासाठी ठाण्यात बोलावले होते. दुसरीकडे, सूरज चोरीचे साहित्य शहरातील काही चोरट्यांना द्यायचा आणि ते त्या साहित्याची विल्हेवाट लावायचे. दोन दिवसांपूर्वी जरीपटका (नागपूर) पोलिसांनी कामठी शहरातील या चोरट्यांच्या घरांची झडती घेतली होती. त्यांच्याकडे चोरीचे साहित्य असल्याबाबत सौरभ पोलिसांना माहिती देत असल्याचा त्यांचा संशय होता. त्यातून त्यांच्यात वादही उद्भवला होता.
तरुणाची भरदिवसा निर्घृण हत्या : कामठीच्या समतानगरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 9:02 PM
पोलिसांना माहिती देत असल्याच्या संशयावरून काहींनी दुचाकीने जात असलेल्या तरुणावर आकस्मिक हल्ला चढविला. त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची भरदिवसा निर्घृण हत्या केली.
ठळक मुद्देपोलीस खबऱ्या असल्याचा संशय