नागपूर : ‘फॉर्च्युन फाउंडेशन’तर्फे १३ व १४ मार्च रोजी ‘यूथ एम्पॉवरमेंट समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता नोकरीच्या मुलाखती ‘ऑनलाईन’ माध्यमातून होणार आहेत.
‘फॉर्च्युन फाउंडेशन’चे अध्यक्ष माजी आमदार अनिल सोले यांच्या संकल्पनेतून या ‘समिट’चे आयोजन होत आहे. तरुणांना रोजगार देणारे आणि उद्योगाचे शेकडो मार्ग खुले करणारे समिट म्हणून या आयोजनाची ओळख आहे. यंदा जवळपास पाच हजार जागांसाठी ऑनलाईन मुलाखती होणार आहेत. मात्र, त्यासाठी नोंदणी आवश्यक असणार आहे. अॅप किंवा संकेतस्थळावरून ही नोंदणी करता येणार आहे. इच्छुक तरुणांना २८ फेब्रुवारीला सायंकाळी सहापर्यंत ही नोंदणी सुरू असेल. यंदा सर्व मुलाखती ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. यासोबतच सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात १३ व १४ मार्चला दिवसभर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. मुद्रा लोनशी संबंधित मार्गदर्शन करणारे स्टॉलही याठिकाणी असणार आहे.