लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘वर्क फ्रॉम होम’च्या काळात ‘जी-मेल’, ‘जी-ड्राईव्ह’, ‘यूट्युब’ यांच्याशिवाय कामाचा लोक विचारदेखील करू शकत नाही. तरुणाई तर यांच्याशिवाय राहण्याचा विचारदेखील करू शकत नाही. मात्र सोमवारी सायंकाळी ‘गुगल’च्या अनेक सेवा ‘क्रॅश’ झाल्या अन् जगातील इतरांप्रमाणे नागपुरातील ‘नेटीझन्स’च्या तोंडचे पाणीच पळाले. नेमके काय होत आहे याचा उलगडा अगदी तंत्रज्ञांनादेखील होत नव्हता. अर्ध्या तासानंतर सेवा बऱ्यापैकी पूर्ववत झाल्या. मात्र अनेकांना ते ‘गुगल’वर किती विसंबून आहेत याची जाण निश्चितपणे झाली.
‘कोरोना’चा संसर्ग अद्यापही कायम असल्यामुळे नागपुरात अनेक जण घरूनच काम करीत आहेत. घरून काम करीत असताना ‘गुगल’च्या विविध ‘सर्व्हिसेस’चा प्रचंड वापर होत आहे. अगदी बैठकांपासून ते मुलांचे शिक्षण ‘गुगल’च्या माध्यमातून होत आहे. सायंकाळच्या वेळी अनेक जण काम संपविण्याच्या गडबडीत होते. तर अनेक ‘कोचिंग सेंटर्स’चे ‘जी-मिट’वर ‘लाईव्ह क्लासेस’देखील होते. मात्र ५.२५ नंतर अनेक सेवा सुरूच होत नव्हत्या. अगदी ‘जी-मेल’देखील सुरू नव्हते. त्यामुळे अनेकांनी चक्क ‘गुगल’वरच नेमकी समस्या शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथेदेखील काहीच येत नव्हते. अखेर ३५ मिनिटानंतर बहुतांश सेवा पूर्ववत झाल्या अन् एका मोठ्या दिव्यातून सुटल्याची भावना नेटकऱ्यांमध्ये होती.
‘गुगल’लाच ‘कोरोना’ झाला का जी ?
अर्ध्या तासाच्या कालावधीत ‘गुगल’व्यतिरिक्त इतर ‘प्लॅटफॉर्म’वर अक्षरश: प्रश्नांचा भडीमार झाला. अनेकांनी तर भन्नाट कल्पना लढवत एकाहून एक तर्क देण्यास सुरुवात केली. ‘गुगल’लाच ‘कोरोना’ झाला का, असा सवालच एकाने उपस्थित केला. याशिवाय ‘सोशल मीडिया’वर विविध ‘मीम्स’चा तर रात्रीपर्यंत वर्षाव सुरू होता.