नागपूर : शिकून सवरून स्वत:चे भविष्य घडविणाऱ्या वयात क्षुल्लक कारणावरून चांगल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीच हर्ष डांगे या विद्यार्थ्याची हत्या केल्यामुळे शैक्षणिक वर्तुळातही खळबळ उडाली आहे. मुळात हर्षचे आरोपींसोबत कुठलाही वाद झाला नव्हता. मित्राच्या मित्राचा वाद झाल्याने तेथे समोरच्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी जाण्यासाठी काही विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. जखमी विद्यार्थ्याच्या एका फोनवर त्याला मदत करण्यासाठी हर्ष गेला व काहीही चूक नसताना त्याचाच बळी गेला.
शुक्रवारी सेमिनरी हिल्स परिसरात विद्यार्थ्यांच्या हल्ल्यात हर्ष डांगेचा मृत्यू झाला होता अंकित कसर हा गंभीर जखमी झाला होता. हा वाद नेमका कशावरून सुरू झाला व नेमके इतके विद्यार्थी सेमिनरी हिल्स परिसरात कसे काय पोहोचले होते, याची पोलिसांनी चौकशी सुरू केली. अनिकेत कसरच्या बयाणानंतर या प्रकरणातील आणखी एक सत्य समोर आले आहे. हर्षचा आरोपींसोबत कुठलाही वाद झाला नव्हता. दीपांशू पंडित आणि इतर आरोपींसोबत अनिकेत कसर व त्याच्या मित्रांचा वाद झाला होता. हा वाद होऊन काही मिनिटे झाले असताना, अनिकेतला त्याच्या एका मित्राचा फोन आला. संबंधित मित्राचाही एसएफएस महाविद्यालयाजवळ एका मुलाशी वाद झाला होता. आपल्याला ५ ते ६ मुले घेऊन एसएफएसजवळ पोहोचायचे आहे, असे मित्राने अनिकेतला सांगितले.
अनिकेतनेही लगेच सहा जणांना फोन करून बोलविले. त्यात हर्षही होता. मित्राने बोलविल्यामुळे हर्ष जाण्यास तयार झाला. एकूण आठ जण एसएफएस महाविद्यालयाजवळ पोहोचले व तेथे १५ मिनिटे थांबल्यावरही कुणीच आले नाही. त्यामुळे सगळे जण बालोद्यानजवळील पानटपरीवर गेले. तेथेच दीपांशूने त्यांना गाठले. त्यांनी अनिकेतवर चाकूने हल्ला केला, ते पाहून इतर मित्र पळून गेले. मात्र, मित्राला वाचविण्यासाठी एकटा हर्ष धावून आला. संतप्त आरोपींनी हर्षवरच वार करत त्याचा बळी घेतला.
गैरसमजातूनच झाला होता वाद
अनिकेत कसर व आरोपी दीपांशू पंडित यांच्यात झालेल्या वादाचे कारणही गैरसमज हेच होते. शुक्रवारी अनिकेतचा अंतिम वर्षाचा एफटीआयचा पेपर होता. तो पेपर सोडवून तो महाविद्यालयाच्या बाहेरील पानठेल्यावर दोन मित्रांसह उभा होता. तिघेही जण थट्टामस्करी करत होते. त्याच वेळी त्यांचा ज्युनिअर दीपांशूही तेथे सहा मित्रांसह उभा होता. ते आपलीच खिल्ली उडवत आहे, असा त्याचा गैरसमज झाला व त्यातून वाद सुरू झाला. दीपांशूचा एक मित्र व अनिकेतमध्ये नंतर तेथेच हाणामारी झाली.