लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या परंतु आता व्यवसायीकरण झालेल्या मेडिकलच्या तलावाने बुधवारी आणखी एका युवकाचा बळी घेतला. तलावावर सुरक्षिततेचे नियम पाळले जात नसल्याने हा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. मेडिकल प्रशासनाने याला गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.नवीन छगन श्रीराव (२१) रा. रेणुका माता नगर हुडकेश्वर रोड असे मृताचे नाव आहे.एस.बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च कॉलेजचा नवीन हा विद्यार्थी होता. कॉम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाचे तो शिक्षण घेत होता. पोहणे शिकण्यासाठी १५ दिवसांपूर्वी मेडिकलच्या जलतरण तलावावर त्याने नोंदणी केली होती. त्याची बॅच रात्री ९ ते १० वाजताची होती. प्राप्त माहितीनुसार, नवीन २४ एप्रिल रोजी सायंकाळी तो ६ ते ७ वाजताच्या बॅचला आला. ही बॅच वैद्यकीय विद्यार्थ्यांची असते. साधारण ५० वर विद्यार्थी तलावावर होते. रात्री ७ वाजताच्या सुमारास दोन विद्यार्थ्यांना कुणीतरी तलावाच्या तळाला असल्याचे आढळून आले. त्यांनी प्रशिक्षकाला याची माहिती दिली. नवीनला लागलीच पाण्याबाहेर काढण्यात आले. प्रथमोपचार करून तेथून मेडिकलच्या अपघात विभागात नेले. अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. रात्री ११.३० वाजता उपचारादरम्यान नवीनचा मृत्यू झाला. अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. विशेष म्हणजे, याच तलावात काही वर्षांपूर्वी मेडिकल एमबीबीएसचा दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा पोहताना मृत्यू झाला होता. त्यावेळीही तलावाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.प्रशिक्षकाचे दुर्लक्षच कसे होते?नवीनचे वडील छगन श्रीराव यांनी पोहणे शिकविणाºया प्रशिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्षच कसे होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, छगनची बॅच रात्री ९ वाजता होती. त्यानंतरही प्रशिक्षकाने त्याला ७ वाजताच्या बॅचला कसे येऊ दिले. या संदर्भात पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही श्रीराव यांनी सांगितले.चौकशीच्या अहवालावर कारवाई करूजलतरण तलावात पोहताना युवकाचा मृत्यू होणे ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेला घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्य समिती या घटनेची चौकशी करणार आहे. समितीचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करणार.डॉ. सजल मित्राअधिष्ठाता, मेडिकल
त्याने खोल पाण्यात उडी मारली असावी मेडिकलच्या जलतरण तलावाचे कंत्राटदार दिलीप हेलचेल यांचे म्हणणे आहे की, नवीनची बॅच रात्री ९ ते १० वाजताची होती. परंतु बुधवारी तो ६ वाजताच्या बॅचला आला. ५० मिनिटांची एक बॅच असते. ६ वाजून ५० मिनिटांनी आम्ही शिटी वाजवून सर्वांना बाहेर काढतो. याच दरम्यान नवीन पाण्यात गटांगळ्या खात असल्याची आरडाओरड झाली. लागलीच प्रशिक्षकांनी त्याला बाहेर काढले. डॉक्टर सोबतीला असल्याने लागलीच प्रथमोपचार करून मेडिकलमध्ये दाखल केले. नवीन हा शिकाऊ विद्यार्थी होता. त्याने बॅच संपल्यानंतर बाहेर येऊन खोल पाण्यात उडी मारली असावी, असा अंदाज आहे.