नागपूर : एकीकडे आर्मीमध्ये जाण्यासाठी तरुणांमध्ये अनिच्छा असल्याचे बोलले जाते. मात्र ११८ इन्फन्ट्री बटालियनच्या नागपूर बेसमध्ये रविवारपासून सुरू झालेल्या सैन्य भरतीसाठी देशभरातून आलेल्या तरुणांचा ओढा पाहता या बोलण्यामध्ये विरोधाभास दिसून येतो. यातील बहुतेकांचा प्रश्न हा रोजगाराशी संबंधित असला तरी, अनेकांनी आर्मीबाबत असलेले आकर्षण आणि देशसेवेसाठी आर्मी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोलून दाखविले.भरतीच्या पहिल्या दिवशी उमेदवारांची कागदपत्रे तपासून रनिंगवर भर देण्यात आला. यातून निवड झालेल्या उमेदवारांची फिजिकल, मेडिकल, मौखिक आणि इतर चाचण्या घेऊन अंतिम निवड केली जाणार असल्याची माहिती आहे. सैनिक पदासह, मोची, परीट, कुक, हाऊसकिपींग या पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, हरियाणा, बिहार अशा राज्यातून हा हा म्हणता १० हजाराच्या वर तरुण भरतीत सहभागी झाले. भरतीची शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे, मात्र १२ वीच नाही, तर कला, वाणिज्य व विज्ञान पदवीधरासह पॉलिटेक्निक आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थीही यात सहभागी झाले. धावल्यानंतर घामाघूम होऊन बाहेर आलेल्या तरुणांशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला असता, अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. यातील अनेकांच्या प्रतिक्रिया गंभीर विचार करायला लावणाऱ्या आहेत.(प्रतिनिधी)अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचे सैनिकी स्वप्न४ठाण्याहून आलेला स्वप्नील पाटील अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी. १२ वी नंतर वयाच्या अटीमुळे डिफेन्सच्या परीक्षेला बसू शकला नाही. मात्र सैन्यात जाण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले. यामुळेच त्याने आतापर्यंत अनेकदा सैन्य भरतीत सहभाग घेतला. त्याच्या सोबतच आलेला चेतन शिंदे हा मिलींग मशिनचे पार्ट्स बनविण्याचे वर्कशाप चालवितो. मात्र सैन्यात जाण्यासाठी त्यानेही इच्छा दर्शविली. १२ वी चा समर पस्टे व बीए झालेला सागर पस्टे या बंधूनीही सैन्यात जाण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न चालविले आहेत. सैनिक म्हणजे प्रतिष्ठा४राजस्थानमध्ये सरकारी नोकरी असणाऱ्याला चांगली प्रतिष्ठा आहे, मात्र सैन्यात असलेल्यांना अधिक मान मिळत असल्याचे शिक्षक ट्रेनिंग करणाऱ्या अजय कुमार याच्यासह संजय गुजर, श्रीचंद सिध्द, संतोष कुमार व इतरांनी सांगितले. सरकारी नोकरी किंवा सैन्यात असलेल्यांना लग्नासाठी मुलींच्या घरच्यांकडून अधिक मागणी असल्याचेही अनेकांनी सांगितले.काहींना हवा आहे अनुभव४बीकॉम करीत असलेल्या राजस्थानच्या राम यादवला दिल्ली पोलिसांत जायचे आहे व त्यासाठी तो सिव्हील सर्व्हिसेसची तयारी करीत आहे. त्यामुळे सैन्य भरतीचे ट्रेनिंग कसे होते, ते अनुभवण्यासाठी तो या भरतीत सहभागी झाला. त्याच्यासारख्याच अनेकांनी हा अनुभव घेण्यासाठी सहभाग घेतला.बेरोजगारीचा प्रश्न गंभीर४सैन्य भरतीत येणाऱ्यांमध्ये बहुतेकांची समस्या ही रोजगाराचीच होती. सैन्यातच नाही, तर रोजगारासाठी कोणतीही नोकरी करण्यास तयार असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. वर्धा जिल्ह्यातील पदवीनंतर पीजीडीसीसीएचा डिप्लोमा करणारा संदीप कावळे याने बेरोजगारीची व्यथा सांगितली. राजस्थानचा एमए करणारा लोकेंद्र सिंग याने नोकरीसाठी कोणत्याही राज्यातील भरतीत जाण्यास तयार असल्याचे सांगितले. अशा असंख्य तरुणांनी बेरोजगारीच मुख्य समस्या असल्याचे सांगितले. थोड्या जागांसाठी हजारो युवकांचे दाखल होणे, बेरोजगारीचेच प्रतीक असल्याचे नाकारता येत नाही.देशसेवेचा सर्वोत्तम पर्याय४सीमेवर राहून देशासाठी बलिदान करणारे सैनिक आजही देशसेवेचे आदर्श असल्याचे अनेकांच्या बोलण्यावरून लक्षात येते. पॉलिटेक्निक करणारा अमरावतीचा आशिष दरणे, डीफार्म करणारा आकाश चौधरी आणि आतापर्यंत २० वेळा सैन्य भरतीत सहभागी झालेला वर्ध्याचा चंदू भुंबर यांनी तर देशासाठी काहीतरी करण्यासाठी सैन्यात जाणे हेच अंतिम लक्ष्य ठरविले आहे. राजस्थानचा वसीम सज्जाद, बाबुलाल कुमावत(बीएससी), संजय कुमावत, रामअवतार ही यातीलच नावे आहेत. व्यवस्थेवर अनेकांची नाराजी४सैन्य भरतीसाठी नागपुरात हजारो तरुणांनी हजेरी लावली. मात्र देशभरातून आलेल्या या युवकांसाठी सोयींचा अभाव होता. भरतीसाठी आलेल्या हजारोना कस्तूरचंद पार्क मैदान किंवा फुटपाथवर रात्र काढावी लागली. सुदैवाने पाऊस आला नाही, मात्र तशी शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या युवकांनी कुठे आसरा घ्यावा याची कोणतीही व्यवस्था नाही. या युवकांना भोजनाच्या अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. काहींनी भरती प्रक्रियेवरही नाराजी व्यक्त केली.
तरुणांमध्ये सैनिक भरतीची ‘क्रेझ’
By admin | Published: September 22, 2015 4:26 AM