लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल, इंटरनेटच्या दुनियेत वावरताना करियरकडे लक्ष ठेवणारी तरुणाई पर्यावरणबाबतही तेवढीच सजग असल्याचे दिसून येते. ही सजगता बाळगून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबविण्याची उदाहरणे समोर येतात. अशाच काही तरुणांनी चालविलेले एक अभियान सध्या लक्षवेधी ठरत आहे. हे अभियान आहे शहरात आमराई फुलविण्याचे. होय, या तरुणांनी आंब्याच्या कोय जमा करून वस्त्यांमध्ये, घरोघरी आणि मैदानात आंबा लागवड सुरू केली असून, येत्या पाच वर्षांत आमराई विकसित करण्याचे ध्येय बाळगले आहे.ग्रोविल फाऊंडेशनच्या माध्यमातून आमराई घडविण्याचे अभियान राबविण्यात आले आहे. या ग्रुपचा सक्रिय सदस्य आणि इंटेरियर डिझायनर असलेला आकाश जगताप यांनी या अभियानाबाबत लोकमतला माहिती दिली. या ग्रुपमध्ये सध्या १५० च्यावर सक्रिय सदस्य आहेत. या मित्रांनी उन्हाळा सुरू झाल्यापासून हे अभियान चालविले. आंबा खाल्ला किंवा घरी रस बनविला की कोय फेकून देण्याची सवय असते. ग्रुपच्या मित्रांनी सुरुवातीला या कोय जमा करण्यासह जवळचे मित्र, नातेवाईक यांना जागृत करण्याचे काम सुरू केले. आंब्याची कोय फेकण्याऐवजी ती घरी, आसपास, वस्तीत किंवा जवळच्या उद्यान, मैदानात लावावी असे आवाहन केले. पाहता पाहता १५० च्यावर सदस्य जुळले. यांनी मिळेल त्या ठिकाणी कोय लागवड केली.१५ ऑगस्टला महाअभियानविशेष म्हणजे या ग्रुपच्या सदस्यांकडे ९०० ते १००० आंब्याच्या कोय सध्या जमा आहेत. अभियानाशी जुळलेल्या कल्याण मित्र एनजीओच्या ग्रीष्मा नारनवरे यांनी ५०० रोपटी तर संकेत बाबरिया यांनी २०० रोपटी घरी तयार करून ठेवली आहेत. येत्या १५ ऑगस्टला शहरात आंबा लागवडीचे महाअभियान राबविणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. शिवाय महापालिका व नासुप्र यांच्या सहकार्याने शहरात एक-दोन ठिकाणाची निवड करून आमराई वाढविण्याचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अशी झाली जाणीवपक्षी निरीक्षणासाठी या ग्रुपचे सदस्य एकदा सोनेगावच्या जंगलात गेले. या जंगलात २०० च्यावर आंब्याची झाडे आहेत व त्यावर ४०० च्या आसपास प्रजातीच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. आंब्याच्या विशाल वृक्षांवर जैवविविधता वाढत असल्याची गोष्ट त्यांच्या लक्षात आली. शिवाय भरतवन वाचविण्याच्या अभियानात सहभागी असल्याने याप्रमाणे एखादे वन फुलविण्याच्या विचारातून हे अभियान सुरू केल्याचे आकाशने सांगितले.संगोपनाची जबाबदारीजमीन आणि पाण्याची उपलब्धता पाहून वृक्षारोपण केले जाईल. त्यानंतर तीन वर्षे या वृक्षांचे संगोपन करतील, अशा पाच स्थानिक सदस्यांची निवड केली जाईल. फेन्सिंग किंवा ट्री-गार्ड लावून संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे काम करण्यात येईल.
आमराई फुलविण्यासाठी तरुणाई सरसावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:00 AM