नागपूर : वाहन चालविताना होणाऱ्या वादातून हल्ले करण्याचे प्रमाण नागपुरात वाढले आहे. नाराघाट मार्गावर एका दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला बोलत असलेल्या मित्र मैत्रिणींशी याच कारणातून वाद घालत एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. सुदैवाने त्या तरुणाचा जीव वाचला. भर रस्त्यावर हा प्रकार होत असताना कुणीही मदतीला आले नाही हे विशेष. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
गुरुवारी सायंकाळी खुशी नावाची मुलगी ही तिच्या मित्रासह तिच्या मैत्रिणीची दुचाकी परत करण्यासाठी जात होती. त्याचवेळी तिला तिची आणखी एक मैत्रीण सुयोप उके (२३, इंदोरा) याच्यासोबत दुचाकीने जाताना दिसले. बोलण्यासाठी ते नारा घाटाजवळ थांबले. त्यावेळी मागून एमएच ४९ बीसी ७५८७ या दुचाकीवर एक तरुण-तरूणी आले व तरुणाने या चौघांजवळ गाडी थांबवली. त्याने खुशीच्या मित्राला गाडी चालवता येत नाही का असे म्हणत शिवीगाळ केली. आम्ही बरोबरच गाडी चालवत होतो असे खुशीच्या मित्राने म्हटले असता तो दुचाकीचालक संतापला व त्याने तिच्या मित्राला धक्का दिला. तो मारामारी करत असल्याने सुयोपने मध्यस्थी केली. यावर ‘मी मंगल आहे, आज तुझा गेमच वाजवतो’ असे म्हणत त्याने खिशातून चाकू काढला व सुयोपवर वार केला.
सुयोपने हिंमतीने तो वार हाताने थांबविला. मात्र आरोपीने परत वार केला व सुयोपच्या पोटाला जखम झाली. दरम्यान इतर तिघे आरोपीला दूर करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याने त्यांच्यावरदेखील वार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीसोबत असलेल्या मुलीने अखेर त्याला शांत केले व त्यानंतर ते दुचाकीने फरार झाले. खुशी व तिच्या मित्र-मैत्रिणीने सुयोपला खासगी इस्पितळात दाखल केले व त्यानंतर त्याला मेयो इस्पितळात हलविण्यात आले. तिच्या तक्रारीवरून जरीपटका पोलीस ठाण्यात आरोपी मंगल सुरजितसिंह गुलेरिया (२०, मानवनगर, टेकानाका) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.