तिघांना अटक : दवलामेटी परिसरातील घटना, विहिरीत आढळला मृतदेहवाडी : जुन्या वैमनस्यातून पाच जणांनी तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली आणि मृतदेह दवलामेटी परिसरातील विहिरीत टाकला. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी पसार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी परिसरात शुक्रवारी सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. सलीम अहमद शेख (३५, रा. रामजी आंबेडकर नगर, आठवा मैल) असे मृत तरुणाचे नाव आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवी लक्ष्मण कटरे (३०, रा. आठवा मैल), संजय श्रीनाथ मारवे (२४, रा. पालकरनगर, वाडी) व किशोर अशोक साठे (२६, रा. राठी ले आऊट, आठवा मैल) अशी अटक करण्यात आलेल्या तर, गुड्डू लक्ष्मण कटरे (२८, रा. आठवा मैल, नागपूर) व आकाश ऊर्फ सोनू नारनवरे (रा. रामजी आंबेडकर नगर, आठवा मैल, नागपूर) अशी पसार असलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेतील आरोपींनी या गुन्ह्यातील कबुली दिल्याचे वाडी पोलिसांनी स्पष्ट केले. ही घटना २६ ते ३० सप्टेंबर या काळात घडली असवी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. सलीम आणि रवी कटरे व अन्य आरोपींमध्ये वैमनस्य होते. दरम्यान, आरोपींनी सलीमला गोडीगुलाबीने बोलावले आणि त्याला आठवा मैल - दवलामेटी मार्गावरील राठी ले-आऊटमधील मोकळ्या जागेवर नेले. तिथे त्याला सुरुवातीला पाचही जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यांनी सलीमच्या डोक्यावर दगडांनी प्रहार केले. त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्या शरीराला दगड बांधले आणि मृतदेह राठी ले आऊट परिसरात असलेल्या शासकीय विहिरीत टाकू न तिथून पळ काढला. शुक्रवारी सकाळी स्थानिक नागरिकांना विहिरीत मृतदेह असल्याची शंका आल्याने त्यांनी लगेच वाडी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी नागपूरला पाठविला. सलीमच्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या खोल जखमा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी अकबर अहमद शेख (२८) यांच्या तक्रारीवरून भादंवि ३०२, २०१, १४३, १४७ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार भीमराय खणदाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक वाय. एम. खरसान, एच. आर. इंगोले, बी. एन. पुरी करीत आहेत. (प्रतिनिधी)
तरुणाची दगडाने ठेचून हत्या
By admin | Published: October 02, 2016 3:02 AM