खापा पोलिसांचे गैरप्रकाराकडे दुर्लक्ष : खुलेआम अश्लील चाळेअरुण महाजन - खापरखेडाश्री संत ताजुद्दीन बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘वाकी’ला तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळाचा दर्जा आहे. येथे ताजुद्दीबाबांचा दर्गा असून, बाजूला कन्हान नदी वाहते. नदीचा परिसरही निसर्गरम्य आहे. त्यामुळे वाकीची ‘पिकनिक स्पॉट’ अशीही ओळख आहे. येथे येणाऱ्या पर्यटक व प्रेमीयुगुलांच्या हिडीस प्रदर्शनामुळे या स्थळाच्या पावित्र्याला काळीमा फासला जात आहे. या ठिकाणी पोलीस शिपाई तैनात केले असतात. मात्र, ते केवळ बघ्याची भूमिका बजावतात. कन्हान नदीच्या पात्रातील असलेल्या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला. मात्र, तरुणांना नदीच्या पात्रात व डोहात उतरण्याचा मोह आवरत नाही. या डोहात अनुचित प्रकार घडल्यानंतर खापा पोलीस ठाण्याच्यावतीने तिथे तीन-चार दिवस पोलीस शिपाई तैनात केले जातात. त्यानंतर परिस्थती ‘जैसे थे’ होते. नदीच्या परिसरात फिरणाऱ्या प्रेमीयुगुलांची संख्याही रोज मोठी असते. या प्रेमीयुगुलांना ‘ब्लॅकमेल’ करून त्यांना लुटण्याच्या प्रसंगी अतिप्रसंगाच्या घटनाही घडल्या आहेत. या गंभीर प्रकाराबाबत कुणीही पोलिसांत तक्रार दाखल करीत नाही. ओल्या पार्ट्या, दारू पिणे, गांजा ओढणे, जुगार खेळणे, हाणामारी करणे, अनैतिक कृत्य, उत्तेजक औषधांच्या रिकाम्या स्ट्रीप आढळणे आदी बाबी येथे हळूहळू सामान्य होत चालल्या आहेत. हा सर्व प्रकार पोलीस प्रशासन उघड्या डोळ्याने पाहणे पसंत करते. मात्र, या गंभीर प्रकाराला कायमचा आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करीत नाही. शहरी तरुणांची वाकीकडे धाववाकी येथे धार्मिक स्थळापासून काही अंतरावर असलेल्या नदीकिनारी येणारे प्रेमीयुगुल हे शहरी भागातून येतात. ते बाईक, स्कुटी अशा वाहनांनी येत असून, त्यांचे वाहनांवरील वर्तन अशोभनीय असते. नदी किनाऱ्यावर जाण्यासाठी वाकी गावातूनच रस्ता आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या व शाळकरी मुलामुलींच्या नजराही त्या प्रेमीयुगुलांच्या दिशेने वळतात. तोंडावर स्कार्फ बांधल्यामुळे आपल्याला कोणी ओळखू शकत नाही, या भावनेतून ते मर्यादा ओलांडतात. सूचना फलकांकडे दुर्लक्ष‘कन्हान नदीच्या पाण्यात व कॅनलच्या पाण्यात आंघोळ करणे धोकादायक आहे. नदीच्या पाण्यात जाऊ नका; मृत्यूला आमंत्रण देऊ नका’ असे एकूण चार सूचना फलकही येथे लागलेले आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करतात. जीवघेणा ठरतोय डोहकन्हान नदीच्या पात्रात ‘केशा’ व ‘वाघ’ असे दोन डोह आहेत. दोन्ही डोह पात्राच्या दोन वळणावर असून, ते ५०० मीटर अंतरावर आहेत. या डोहातील पाण्यात भोवरा पडत असून, आत कपारी आहेत. या डोहात १० वर्षांत ३९ जणांना जलसमाधी मिळाली आहे. या डोहात बुडून मरणाऱ्यांमध्ये तरुण-तरुणींचे प्रमाण अधिक आहे. यातील वाघ डोहात वर्षभरापूर्वी नागपूर येथील दाम्पत्यासह दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला होता.
वाकीत नदीकिनारी तरुणांचा उच्छाद
By admin | Published: December 17, 2014 12:28 AM