लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बाथरुममध्ये कपडे बदलत असलेल्या शेजारच्या विद्यार्थिनीची मोबाईलमध्ये चित्रफीत तयार करताना युवकास अटक करण्यात आली आहे. ही घटना धंतोली ठाण्याच्या परिसरात घडली.कोमल कांतिलाल पाटील (२८) असे आरोपीचे नाव आहे. २२ वर्षाची विद्यार्थिनी सोमवारी रात्री १०.३० वाजता बाहेरून घरी पोहोचली. ती बाथरुममध्ये जाऊन कपडे बदलत होती. कोमल हा या विद्यार्थिनीच्या शेजारी राहतो. विद्यार्थिनीला खिडकीच्या फुटलेल्या काचाजवळ सोनेरी रंगाचा मोबाईल दिसला. मोबाईल बाहेरच्या व्यक्तीने हातात पकडला होता. मोबाईलमध्ये आपली चित्रफीत तयार केल्याची शंका आल्यामुळे आरडाओरड करून ती बाथरुमच्या बाहेर आली. तिचा आवाज ऐकून वडीलही बाथरुमकडे गेले. त्यांना कोमल पळताना दिसला. विद्यार्थिनीने धंतोली पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कोमलला ताब्यात घेऊन छेडखानीचा गुन्हा दाखल केला. त्याने घटनेत आपला हात नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या कुटुंबीयांच्या मते घटनेच्या वेळी कोमल झोपलेला होता. पोलिसांना त्याच्या जवळ विद्यार्थिनीने सांगितलेला मोबाईल मिळाला. पोलिसांनी मोबाईल जप्त केला. या घटनेमुळे विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय घाबरले आहेत. कोमल आणि त्याचे कुटुंबीय भांडखोर असल्यामुळे आजूबाजूचे नागरिक त्रस्त असल्याची माहिती आहे.