नितीन गडकरी : गार्गी निमदेव हिला ‘युवा नागभूषण’ पुरस्कार प्रदाननागपूर : आजच्या तरुण पिढीत प्रचंड प्रतिभा आहे. याच प्रतिभेच्या बळावर ही तरुणाई एक दिवस जगाला दिशा दाखवेल. त्या तरुणाईचे प्रतिनिधित्व गार्गी करतेय ही आनंदाची गोष्ट आहे. मी तिच्या भविष्यासाठी सुयश चिंतितो, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजराणी मंत्री नितीन गडकरी यांनी गार्गी गजानन निमेदव हिला आशीर्वाद दिला. राष्ट्रभाषा संकुलात नागभूषण फाऊंडेशनतर्फे रविवारी आयोजित ‘युवा नागभूषण’ पुरस्कार-२०१६ च्या वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त विंग कमांडर अशोक मोटे, डॉ. गिरीश गांधी, सत्यनारायण नुवाल, छोटूभय्या मुंडले व अजय पाटील उपस्थित होते. अध्यक्षपदावरून बोलताना अशोक मोटे म्हणाले, ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान हे संयुक्त राष्ट्रसंघटनेची सामुदायिक प्रार्थना व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. गार्गी ज्या पिढीचे नेतृत्व करतेय त्या पिढीच्या हयातीत ते घडेल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. गार्गी निमेदव हिने या सत्काराला उत्तर देताना या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढवल्याचे सांगितले. ती म्हणाली, या पुरस्काराची मी शान राखेल. त्यासाठी वाट्टेल ते कष्ट घेईल. पुढे खूप शिकून प्रशासकीय अधिकारी व्हायचे आहे व त्याद्वारे समाजाची सेवा करायची आहे. यावेळी डॉ. विलास डांगरे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक, बाळ कुलकर्णी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश गांधी, संचालन रेखा दंडिगे तर आभार अजय पाटील यांनी मानले.(प्रतिनिधी)
तरुणाईचे नेतृत्व जगाला दिशा दाखवेल
By admin | Published: March 06, 2017 2:17 AM