मध्यवर्ती कारागृहातील घटना : पोलिसांनी दाखल केला गुन्हा नागपूर : युग चांडक हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला कैदी राजेश ऊर्फ राजू दवारे याच्यावर दहशतवादी हिमायत बेग याने खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी सकाळी मध्यवर्ती कारागृहात घडली. धंतोली पोलिसांनी या प्रकरणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला. १ सप्टेंबर २०१४ ला राजेश दवारे याने त्याचा मित्र अरविंद सिंग याच्या मदतीने युग चांडकचे अपहरण करून खून केला. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. आता गेल्या ५ मे रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही त्यांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून ते मध्यवर्ती कारागृहाच्या फाशी यार्डमध्ये कैद आहेत. याशिवाय फाशी यार्डमध्ये २०१३ च्या पुणे येथील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मिर्झा हिमायत बेग हा देखील कैद आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाच महिला आणि दोन मुलांच्या खून प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेला जितेंद्र नारायणसिंग गहलोत हासुद्धा नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता जेवणावरून हिमायत बेग आणि गहलोद यांचे राकेश कांबळे या फाशीच्या आरोपीशी भांडण झाले. राकेश आणि त्याच्या मित्रांनी कळमेश्वर येथील लोणारा झोपडपट्टीतील कांचन मेश्राम हिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून खून केला होता. या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बेग आणि गहलोत याचे कांबळेशी भांडण सुरू असताना राजेश दवारे मध्ये पडला. या भांडणात बेग आणि गहलोत याने भाजी वाढण्याच्या मोठ्या चमचाने राजेशच्या डोक्यावर वार केले. यात तो रक्तबंबाळ झाला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले आणि भांडण सोडविले. कारागृह प्रशासनाने धंतोली पोलिसात तक्रार दिली. (प्रतिनिधी)
युग चांडकच्या मारेकऱ्यावर हल्ला
By admin | Published: May 26, 2016 2:58 AM