नागपूर : साहित्य अकादमीच्या युवा साहित्य पुरस्कारासाठी यंदा अमरावती येथील तरुण कवी पवन नालट यांची निवड करण्यात आली आहे. नालट यांच्या ‘मी संदर्भ पोखरतोय’ या कवितासंग्रहाला सन २०२२ साठीचा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ताम्रपट आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दत्ता भगत, रमेश वरखेडे, विठ्ठल वाघ यांच्या निवड समितीने नालट यांच्या कवितासंग्रहाची पुरस्कारासाठी शिफारस केली होती. साहित्य अकादमीकडून याची नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली. २४ भारतीय भाषांमधील ३५ वर्षांखालील वयाच्या साहित्यिकाला युवा साहित्य पुरस्कार देऊन गौरविले जाते. ऑगस्ट २०२२ मध्ये मराठी वगळता इतर २३ भाषांमधील युवा साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
पुरस्कारामुळे सामान्यांचा आवाज बुलंद झाला कविता संग्रहातील ‘मी’ म्हणजे सामान्यांचा आवाज. तो आवाज आता बुलंद झाला आहे. त्याला न्याय मिळाला. हा पुरस्कार तरुणाईला न्याय देणारा आहे. - पवन नालट, युवा कवी, अमरावती.