नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर पहिल्यांदाच पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी शून्य मृत्यूची नोंद झाली. ९८ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची एकूण संख्या ७,५०,२९४ झाली असून, मृतांची संख्या १४,२६१ वर स्थिरावल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचे संकट नियंत्रणात आले आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असली तरी आज गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. ५८ रुग्णांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात १९, चंद्रपूर जिल्ह्यात १३, भंडारा व वर्धा जिल्ह्यांत प्रत्येकी ३, तर गोंदिया जिल्ह्यात २ रुग्णांची भर पडली. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ४,७७,०२७ रुग्ण व ९,०२५ मृत्यू, भंडारा जिल्ह्यात ५९,४७४ रुग्ण व १,१२६ मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात ८४,६६४ रुग्ण व १,५२७ मृत्यू, गोंदिया जिल्ह्यात ४०,२६० रुग्ण व ५७४ मृत्यू, वर्धा जिल्ह्यात ५७,९८९ रुग्ण व १,३५५ मृत्यू तर, गडचिरोली जिल्ह्यात ३०,२५८ रुग्ण व ६५४ मृत्यूची नोंद झाली. पूर्व विदर्भातील या सहा जिल्ह्यांमधून ७,३४,३०७ रुग्ण बरे झाले आहेत.