लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रकोपानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी नागपूर, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यात शून्य मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे, विदर्भातील ११ पैकी ६ जिल्ह्यात शून्य मृत्यू होते. आज ३५७ रुग्ण व १२ मृत्यू आढळून आल्याने रुग्णांची एकूण संख्या १०,९३,४,४९० झाली आहे तर, मृतांची संख्या २०,०४७वर पोहचली आहे.
कोरोनाचे संकट आटोक्यात आले आहे. दैनंदिन रुग्ण व मृत्यूची संख्या हळूहळू कमी होत आहे. यामुळे विदर्भात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेने सर्वाधिक प्रभावित झालेल्या नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी १३० दिवसांनी शून्य मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यात ५५ रुग्ण आढळून आले. जिल्हाबाहेरील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यातही आज पहिल्यांदाच एकही मृत्यू नोंदविण्यात आलेला नाही. येथे २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. बुलडाणा जिल्ह्यात ३५ रुग्ण व प्रथमच शून्य मृत्यूची नोंद झाली. या शिवाय, भंडारा जिल्ह्यात ३ जूनपासून शून्य मृत्यूची नोंद होत आहे. आज १३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गडचिरोली जिल्ह्यात तिसऱ्यांदा एकही मृत्यू नोंदविण्यात आलेला नाही. येथे ३५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यवतमाळ जिल्ह्यातही तिसऱ्यांदा शून्य मृत्यू व १४ रुग्णांची नोंद झाली. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत शून्य मृत्यूची नोंद झाली नसलीतरी मृताचा आकडा एकपर्यंत आला आहे. या जिल्ह्यात ५५ रुग्ण व ४ मृत्यू झाले. गोंदिया जिल्ह्यात यापूर्वी तीनवेळा शून्य मृत्यूची नोंद झाली. ७ रुग्ण व १ मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यात आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ७२ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर ३ रुग्णांचे बळी गेले. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत दोन वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली. ३५ रुग्ण व १ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात ११ रुग्ण व २ मृत्यू झाले.
कोरोनाची शुक्रवारची स्थिती
जिल्हा : रुग्ण : मृत्यू
नागपूर : ५५ : ०० (१ जिल्हाबाहेरील)
भंडारा : १३ :००
वाशिम : २५: ००
गडचिरोली : ३५ : ००
चंद्रपूर : ५५:०४
गोंदिया : ०७ : ०१
अमरावती : ७२ :०३
यवतमाळ : १४ : ००
बुलडाणा : ३५ : ००
अकोला : ३५ :०१
वर्धा : ११ :०२