गुणवंत विद्यार्थिनीला नीटमध्ये दिले शून्य गुण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 10:52 AM2020-10-20T10:52:12+5:302020-10-20T10:53:48+5:30
High court Nagpur News नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नीट परीक्षेमध्ये ६०० गुण मिळण्याची अपेक्षा असताना शून्य गुण देण्यात आल्यामुळे अमरावती येथील वसुंधरा भोजने या गुणवंत विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व नितीन सूर्यवंशी यांनी सोमवारी केंद्र सरकार, राज्य सरकार व नॅशनल टेस्टिंग एजन्सी यांना नोटीस बजावून यावर २६ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
७२० गुणांच्या नीट परीक्षेचा १६ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. काहीतरी तांत्रिक चूक झाल्यामुळे वसुंधराला शून्य गुण दाखविण्यात आले. परिणामी, तिने त्याच दिवशी नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ई-मेलवर निवेदन सादर करून चूक दुरुस्त करण्याची मागणी केली. परंतु, तिला काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिला दहावीमध्ये ९३.४ तर, बारावीमध्ये ८१.८५ टक्के गुण मिळाले होते. याचिकाकर्तीतर्फे अॅड. अश्विन देशपांडे यांनी कामकाज पाहिले.
ओएमआर शीट वेबसाईटवर नाही
नियमानुसार नीट परीक्षेची ऑप्टिकल मार्क्स रेकॉगनिशन शीट नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चे गुणांकन तपासता यावे हा त्यामागील उद्देश आहे. परंतु, वसुंधराची शीट वेबसाईटवर अपलोड करण्यात आली नाही.