लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुपारची वेळ, घड्याळात १२ वाजून १० मिनिटे झाली आणि नागपूरकर त्या क्षणासाठी जागेवर थबकले. डोळे जमिनीकडे लावले तर काय आश्चर्य... कायम सोबत चालणारी स्वत:ची सावलीच त्यांना दिसेना. कुणी गच्चीवर, कुणी रस्त्यावर, आहेत त्या ठिकाणी सावलीचा शोध घेऊ लागले. अगदी डोक्यावर मध्यभागी सूर्य आल्याने ही सावली पायाखाली गेली आणि दिसेनासी झाली. ‘झिरो शॅडो डे’च्या या खगोलीय घटनेचे असंख्य नागपूरकर साक्षीदार झाले.आपली पृथ्वी तिरप्या अक्साने स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरत असते. पृथ्वीच्या या भ्रमणानुसार सूर्य सध्या उत्तरेकडे प्रवास करीत आहे. यालाच उत्तरायण म्हणतात. कर्कवृत्तापर्यंत पोहचल्यानंतर पुन्हा त्याचा प्रवास दक्षिणेकडे सुरू होईल म्हणजेच दक्षिणायन प्रारंभ होते. तज्ज्ञांच्यानुसार पृथ्वीचा धु्रव २३.५ अंश उत्तरेकडे कलल्याने परिभ्रमण करताना सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन होते. त्यामुळे सूर्य विषुववृत्तापासून दक्षिणेकडे २३.५ अंश आणि उत्तरेकडे २३.५ अंश भ्रमण करताना दिसतो. यादरम्यान सूर्य ज्या अक्षांशावरून प्रवास करतो त्या अक्षांशावरील गाव व शहरांमध्ये तो दुपारी काही क्षणांसाठी (मिनिटभर) डोक्यावर म्हणजे खऱ्या अर्थाने मध्यबिंदूवर येतो. या क्षणी आपली सावली आपल्या पायाखाली पडते व जणूकाही ती गायब झाली, असे वाटते. या खगोलीय घटनेचा रोमांचकारी अनुभव रविवारी नागपूरकरांनी घेतला. या घटनेचा मुलांना प्रत्यक्ष आकलन व्हावे व त्याची वैज्ञानिक पार्श्वभूमी समजावी यासाठी रमण विज्ञान केंद्र व तारामंडळात विशेष व्यवस्था करण्यात आली होती.केंद्राचे तांत्रिक मार्गदर्शक महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनात रविवारी केंद्राच्या लॉनमध्ये शून्य सावलीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. विविध आकाराच्या वस्तूंद्वारे मध्यबिंदूवर पडणाऱ्या सावलीचा प्रत्यक्ष आकार दर्शविण्यात आला. ही घटना तशी वर्षातून दोनदा घडते. पण दुसºयावेळी ती पावसाळ्यात येत असल्याने अनुभवणे शक्य होत नाही. या खगोलीय घटनेचे साक्षीदार होण्यासाठी बच्चे कंपनी व त्यांच्या पालकांनी रमण विज्ञान केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. महेंद्र वाघ यांनी या घटनेबाबत मुलांना सविस्तर माहिती दिली. ३० मेपर्यंत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असाच शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. नागपूरमध्ये शून्य सावली असताना इतर ठिकाणी सावलीची स्थिती काय आहे व प्रत्यक्ष त्या क्षणाला ती इतर जागी किती लांब आहे, याचे प्रात्यक्षिकही यावेळी मुलांना दाखविण्यात आले. भर दुपारी ही घटना अनुभवण्यासाठी मुले व नागरिकांमध्ये मोठा उत्साह होता.
लोकमतच्या वृत्ताने मुलांमध्ये उत्सुकतारविवारी शून्य सावली दिवस असून रमण विज्ञान केंद्रात त्याचे प्रात्यक्षिक असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. हे वृत्त वाचूनच मुलांमध्ये झिरो सावली डेबाबत उत्सुकता निर्माण झाली व ते विज्ञान केंद्रात पोहचल्याचे अनेक मुले व पालकांनी यावेळी सांगितले. केंद्रामध्ये १२ वाजून १० मिनिटाला, त्यापूर्वी व त्यानंतर सावलीची स्थिती काय असते, याचे प्रत्यक्षिक मुलांसमोर सादर केले. अंतराळातील प्रत्येक घटना जशी रोमांचकारी असते त्याप्रमाणे हा क्षणही आनंददायी व वेगळा अनुभव देणारा ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.