जिल्हा परिषद आखाडा नागपूर: भाजपच्या मुलाखती तर काँग्रेसचे फॉर्मवाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 04:17 PM2019-12-05T16:17:21+5:302019-12-05T16:17:34+5:30

नागपूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समितीसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे.

Zilla Parishad Akhada Nagpur BJP interviews and congressional forms | जिल्हा परिषद आखाडा नागपूर: भाजपच्या मुलाखती तर काँग्रेसचे फॉर्मवाटप

जिल्हा परिषद आखाडा नागपूर: भाजपच्या मुलाखती तर काँग्रेसचे फॉर्मवाटप

googlenewsNext

नागपूर : राजकीय पक्षांकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी यादी आहे. भाजपाने तर पक्षाचे अर्ज स्वीकारणे बंद करून, उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहे. मात्र काँग्रेस ६ डिसेंबरपर्यंत इच्छुकांना अर्जाचे वाटप करणार आहे. शिवसेनेकडे प्रत्येक जि.प. व पंचायत समिती सर्कलमध्ये इच्छुकांची यादी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ डिसेंबरपर्यंत उमेदवार घोषित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १३ पंचायत समितीसाठी ७ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्याने जिल्हास्तरावरही या तीन पक्षात आघाडी होणार का अशा चर्चा रंगू लागली आहे. मात्र काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या चारही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यंदा लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढली. आता निवडणूक पूर्व आघाडी झाल्यास आपल्याला संधी मिळणार नाही, अशी भावना सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

त्या दृष्टिकोनातून काँग्रेस, भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणुक लढण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपाने जि.प. व पं.स. च्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले. भाजपाकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अवधीत अर्ज सादर केल्याने उमेदवारांच्या मुलाखती सुरु केल्या आहे. बुधवारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उमरखेड व हिंगणा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जि.प. व पं.स. सर्कलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत घेतल्या. दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटी प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी माजी आमदारांच्या बैठकी घेतल्या आहे.

६ डिसेंबरपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागितले आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ३०० वर अर्ज आले असल्याची माहिती आहे. जिल्हा निवड मंडळाची दोन दिवसात बैठक होणार आहे. त्यात सर्कलनिहाय उमेदवारांची निवड करून उमेदवाराचा अहवाल राज्य निवड मंडळाकडे पाठविल्या जाणार आहे. काँग्रेस २० डिसेंबरच्यानंतर उमेदवार घोषित करेल, असे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी सांगितले.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार म्हणाले की, बैठका संपल्या आहे. जि.प.च्या सर्वच सर्कलमधून इच्छुक उमेदवारांची यादी वरिष्ठांकडे पाठविल्यानंतर उमेदवारांची घोषणा होईल. पण शिवसेना जि.प.च्या सर्वच सर्कलमध्ये निवडणूक लढण्यास तयार आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी सांगितले की, ८ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येईल. ३ डिसेंबरपर्यंत उमेदवार घोषित होऊ शकतात.

 

Web Title: Zilla Parishad Akhada Nagpur BJP interviews and congressional forms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.