लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणे निश्चित झाले आहे. शुक्रवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली, तीत चर्चेअंती आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र, कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा झाली नाही. पुढील बैठकीत यासंबंधीची चर्चा होणार आहे.आघाडीच्या चर्चेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्या खामला येथील निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीला आ. सुनील केदार, काँग्रेस नेते नाना गावंडे, आ. राजू पारवे, किशोर गजभिये यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते आ. अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर आदी उपस्थित होते. बैठकीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी दहा वर्षांपासून जिल्हा परिषदेत सत्ता नाही यावर चिंता व्यक्त करीत भाजपला रोखायचे असेल तर आघाडी करण्याशिवाय पर्याय नाही, अशी भावना व्यक्त केली. काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळी लढली तर मतविभाजन होईल व त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसेल व पुन्हा एकदा सत्तेपासून दूर राहण्याची वेळ येईल, यावरही दोन्ही पक्षांचे नेत्यांमध्ये एकमत झाले. शेवटी दोन्ही पक्षांनी आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला.आघाडीचा निर्णय झाल्यानंतर ५८ पैकी कुणी किती जागा लढायच्या हा मुद्दा उपस्थित झाला. मात्र, नेत्यांनी त्यावर सखोल चर्चा करणे टाळले. दोन्ही पक्षांनी मेरिटच्या आधारावर आपापले प्रस्ताव तयार करावे. त्यात पुढील बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शेवटी ठरले.