नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व सीईओना निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी मे महिन्यात २० टक्के बदल्या करण्यात येतात, यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या कर व करोत्तर उत्पन्नातील अपेक्षित महसुली घट व त्याचे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने विविध उपाययोजना करून बदल्यावर निर्बंध घातले होते. मात्र शासन स्तरावर लोकप्रतिनिधी व कर्मचारी संघटना यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे अखेर सरकारला बदल्या करण्याचा निर्णय घ्यावा लागला. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांचा यामध्ये उल्लेख नाही. त्या संदर्भात वेगळ्या सूचना निर्गमित होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या होणार असल्यामुळे विनंती, पती-पत्नी एकत्रीकरण, दुर्धर आजार, ५३ वर्षांवरील कर्मचारी, विशेष बाब आदी प्रकारच्या बदल्या होणार आहेत.
- किती टक्के बदल्या कराव्यात याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ग्राम विकास विभागाच्या १५ मे २०१४ च्या शासन निर्णयात २९ टक्के असा उल्लेख आहे, तर ९ जुलै सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात १५ टक्के मर्यादेच्या आत बदल्या करा, असा उल्लेख असल्याने संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
डॉ. सोहन चवरे, अध्यक्ष, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना