श्याम नाडेकर
नरखेड (नागपूर) : लहान मुलांचे एक स्वतंत्र जग असेल तर... कल्पना करा, ते जग कसे असेल? त्यांचे आचार-विचार-व्यवहार सारेच कसे असतील? दूरदृष्टी असेल का त्यांच्यात? आलेल्या समस्या ते कशा तऱ्हेने हाताळतील? आदी अनेक प्रश्न पडलेच असतील. तर पडू द्या! कारण, या जगाची पायाभरणी झाली आहे. ही गंमत नव्हे तर वास्तव आहे.
नरखेड तालुक्यातील थुगाव निपाणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वत:ची ‘उन्नती विद्यार्थी बचत बँक’ उभारली आहे. या बँकेचे संचालक मंडळ म्हणजे विद्यार्थीच अन् गोळी-बेरीज करणारेही विद्यार्थीच आहेत. या बँकेला आज म्हणजे ११ ऑगस्टला चार वर्षे पूर्ण होत आहेत.
कसा झाला बँकेचा जन्म?
- चार वर्षांपूर्वी मुख्याध्यापक धनंजय पकडे यांच्या कल्पकतेतून मुलांना व्यवहाराचे धडे प्रत्यक्षात मिळावे म्हणून दीपावलीच्या अनुषंगाने पणती बनवणे व विक्री उपक्रम राबवण्यात आला. त्यातून, दोनच दिवसांत विद्यार्थ्यांना ६,४०० रुपये नफा मिळाला. हा नफा वितरित करण्याऐवजी ‘उन्नती विद्यार्थी बचत बँक’ उदयास आली आणि या बँकेची स्थापना ११ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली. बँकेला तिसरी ते आठव्या वर्गातील १२ विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ आहे. त्यातूनच अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहार होतो. कॅशबुक, लेझर नोंदणी आदी कामे हेच विद्यार्थी पार पाडतात.
आजघडीला बँकेचे १४४ खातेदार आहेत आणि बँकेत ७८,३२७ रुपये जमा आहेत. शाळेची पटसंख्या १०१ असताना खातेदार १४४ कसे, असा प्रश्न पडल्यावर लक्षात आले की २०१९ पासूनचे काही माजी विद्यार्थी आजही बँकेचे खातेदार आहेत. या बँकेतून जमा रकमेवर त्रैमासिक व्याज आकारणीही दिली जाते. याच उपक्रमाची प्रेरणा घेऊन जि.प. नागपूरच्या मुख्याधिकारी सौम्या शर्मा यांनी जिल्ह्यात ‘आर्थिक साक्षरता’ उपक्रम लागू केला आहे. या शाळेतील विद्यार्थी आपली गुंतवणूक रोखे बाजार (शेअर मार्केट), एसआयपी आदींवर चर्चा करताना आढळतात.
बँकेचे संचालक मंडळ
- बँकेची निवडणूक लोकशाही पद्धतीने होते. त्यातून १२ संचालकांचे मंडळाची निवड होते. वर्तमानात अध्यक्ष पार्थ हिवसे, उपाध्यक्ष आरुषी टेकाडे आणि सचिव आर्या डिग्रसकर यांच्यासह हिमांशू चौधरी, दीपल चौधरी, हर्ष ढोले, भावेश चौधरी, मनस्वी चौधरी, योगिता गोरे, पार्थ चौधरी, तेजमनी भोयर आणि दोन नामनिर्देशित संचालक नयन टेकाडे आणि विधी सिरसकर असे संचालक मंडळ आहे.
डिजिटल बँक, मुदत ठेव योजना
- भविष्यात बँकेचे सर्व व्यवहार डिजिटली करण्याचा व निरनिराळ्या मुदत ठेव योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्याचा मानस संचालक मंडळ व्यक्त करत आहे.