नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीईओ योगेश कुंभेजकर यांनी फाईल ट्रॅकरचा नवा प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेत राबविला आहे. हा प्रयोग सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आहे. या प्रयोगाचे निकाल आता हाती येऊ लागले आहेत. फाईलींचा आठ दिवसांत निपटारा तर होतच आहे, शिवाय विभागांच्या कामांची गती वाढायला लागली आहे़.
सरकारी काम म्हटलं की नको रे बाबा, असाच काहीसा समज असतो़ त्यातच चिरीमिरी देऊन वेगाने कामे होण्याचे प्रकार प्रशासनात नवे नाही़. परिणामी, प्रशासनाची बदनामी तर होतेच याउलट कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित होतो़. ही वेळच यंत्रणेवर येऊ नये व सर्वसामान्यांची कामे वेगाने व्हावी म्हणून जिल्हा परिषदेत फाईल ट्रॅकर लावण्यात आले आहे. गुंतागुंतीच्या फाईल कामाचे स्वरूप व त्यातील त्रुटींच्या पूर्ततेमुळे थोडा उशीर होतो. मात्र, त्या फाईलची नेमकी स्थिती ऑनलाइन बघायला मिळते. तसा निर्णय मग त्या फाईलवर घेतला जातो.
सुरुवातीला सीईओ कुंभेजकर यांनी अशा प्रकारचा प्रयोग राबविणे काळाची गरज असल्याचे सूचविले. त्यांनी प्रत्येक विभागाचा अभ्यास केला. फाईलींची प्रलबिंत संख्या आणि कारणांचा शोध घेतला. अंर्तभूत ज्ञानाच्या कौशल्यावर काही टेक्नीकल डेव्हलपर्सशी त्यांनी चर्चा केली. कामाची पद्धती, फाईलींच्या विभागनिहाय हालचाली आणि कशाप्रकारे फाईल ट्रॅकर काम करेल, याचे डेमो समजावून घेतले. खात्री पटल्यानंतर फाईल ट्रॅकरची अंमलबजावणी केली. दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ ट्रॅकर बसवून होत आहे. दर आठवड्याला कुठल्या विभागाने किती फाईली निकाली काढल्यात, त्याचे तपशील समोर यायला लागले आहेत. विभागांच्या कामांची रेटिंग बघायला मिळते आहे.
- अशी आहे फाईल ट्रॅकर सिस्टिम
प्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. त्यामुळे फाइल किती दिवस संबंधित विभागात राहिली याची नोंद होत आहे. तसेच कुठल्या विभागाने आठवड्याला किती फाईल निकाली काढल्यात याच्या नोंदीही मिळताहेत.