नागपूर : जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत बसण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वच विद्यार्थी प्रविष्ट व्हावेत म्हणून शिक्षण समितीने पुढाकार घेतला. परीक्षेसाठी लागणाऱ्या परीक्षा फी ची तरतूद जिल्हा परिषदेने सेस फंडाच्या माध्यमातून केली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वर्ग पाचवा व आठव्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये जिल्हा परिषदेचे ६६३० विद्यार्थी प्रविष्ट झाले. यापूर्वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी बसण्याची संख्या फार अल्प रहायची. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा अभाव अथवा आर्थिक बाबीमुळे विद्यार्थी परीक्षेला बसत नव्हते. पण शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांनी परीक्षेला बसण्याची इच्छा असलेल्या सर्व विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध करून दिली. परीक्षेसाठी लागणाऱ्या ६ लाख रुपयांच्या फीची तरतूद त्यांनी सेस फंडातून केली. यासाठी जि.प.चे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पालकांचेही सहकार्य लाभले.
- एवढ्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्तीच्या परीक्षेत पहिल्यांदाच जिल्हा परिषदेचे विद्यार्थी प्रविष्ट झाले. शिक्षकांनीही त्यासाठी सहकार्य केल्याने आम्ही हा प्रयोग यशस्वी करू शकलो.
भारती पाटील, सभापती, शिक्षण समिती