जिल्हा परिषद निवडणुकीला बंडखोरीची लागण : उमेदवारही गोंधळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:30 PM2019-12-23T20:30:26+5:302019-12-23T20:33:09+5:30
जिल्हा परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच गोंधळात राहिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाही हा गोंधळ कायमच होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद निवडणूक सुरुवातीपासूनच गोंधळात राहिली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असतानाही हा गोंधळ कायमच होता. राजकीय पक्षांनी अखेरपर्यंत अनेकांना एबी फॉर्म दिले नाही. त्यामुळे आपण पक्षाचा उमेदवार आहे की नाही, हा गोंधळ अखेरपर्यंत होता. दरम्यान, सात वर्षानंतर निवडणूक होत असल्याने निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते इच्छुक होते. पण ऐनवेळेवर भरवशावर ठेवलेल्या उमेदवाराला डावलल्याने बंडखोरीचीही लागण झाली. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची महाआघाडी अखेरपर्यंत संभ्रमात राहिली.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतरही निवडणूक होते की नाही, हा गोंधळ उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख येईपर्यंत कायम होता. सर्वोच्च न्यायालयाने अखेर याप्रकरणी निवडणूक आटोपल्यानंतर सुनावणी घेऊ, असा निर्णय दिल्याने इच्छुक उमेदवार तयारीला लागले. त्यातच जिल्ह्यात २१ डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनाचा माहोल होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवार हा अखेरचा दिवस उमेदवारांजवळ होता. सोमवारी तहसील कार्यालयात पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना अर्ज भरायचे होते, तेही ३ वाजताच्या आत. परिणामी चांगलाच गोंधळ उडाला होता. राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले, त्यांच्या मुलाखती घेतल्या, उमेदवारांच्या नेत्यांनी त्यांना तिकीट मिळवून देण्याचा भरवसाही दिला, पण ऐनवेळी भलताच उमेदवार निश्चित करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरीची लागण झाली. भाजपामध्ये ही बंडखोरी मोठ्या प्रमाणात फोफावली.
काँग्रेस-राष्ट्रवादीची वेळेपर्यंत युतीबाबत संभ्रम कायम होता. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागेवरून झालेल्या वाटाघाटीत राष्ट्रवादीचे काही भागात अस्तित्व नाकारले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी आघाडीला समर्थन दिले नाही. त्यामुळे काही सर्कलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार रिंंगणात आहेत. पण दोन्ही पक्षाने अजूनही बऱ्याच उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे आपण पक्षाचे अधिकृत उमेदवार आहो की नाही, हा गोंधळ उमेदवारांमध्ये दिसून आला. पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारीच्या बाबतीत चांगलाच गोंधळ दिसून आला. एकीकडे इच्छुकांची संख्या मोठी आणि पक्षाकडून काहीच अधिकृत सांगण्यात येत नसल्याने पंचायत समितीच्या उमेदवारांमध्ये चांगलाच संभ्रम झाला होता. ऐन वेळी उमेदवारी अर्ज भरण्यात येत असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात उमेदवाराला अडचणी येत असल्याचे दिसून आले.
नागपूर ग्रामीणमध्ये झाली बंडखोरी
नागपूर ग्रामीणमध्ये येणाऱ्या बोरखेडी फाटक जि.प. सर्कलमध्ये बाहेरून उमेदवार दिल्यामुळे नाराज झालेल्या पं.स. सदस्य उर्मिला मिलमिले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. बेसा सर्कलमध्ये भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून काँग्रेसची उमेदवारी मिळविली आणि भाजपाला चांगलाच झटका दिला. खरबीमध्येही भाजपाच्या विद्यमान सदस्यांना डावलल्याने नाराजीचा सूर उमटला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती न झाल्यामुळे काही सर्कलमध्ये दोन्ही पक्षांनी उमेदवार रिंगणात उतरविले.
दोन्ही माजी उपाध्यक्ष अपक्ष म्हणून रिंगणात
२०१२ ला झालेल्या निवडणुकीनंतर भाजप, राष्ट्रवादीची सत्ता बसली. यात भाजपाच्या संध्या गोतमारे या अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले हे उपाध्यक्ष झाले. पुढे राष्ट्रवादीशी भाजपाची तूतूमैमै झाल्यानंतर भाजपाने अडीच वर्षासाठी भाजपाच्या निशा सावरकर यांना अध्यक्ष तर शिवसेनेचे शरद डोणेकर यांना उपाध्यक्ष बनविले. पण यावेळी या दोन्ही अध्यक्षांनी जिल्हा परिषद निवडणूक लढण्यास नकार दिला. तर चंद्रशेखर चिखले यांच्या मेटपांजरा सर्कलमध्ये राष्ट्रवादीने इतरांना उमेदवारी दिली. त्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. दुसरीकडे शरद डोणेकर यांनी शिवसेनेशी फारकत घेऊन भाजपाकडून तिकीट मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनाही यश आले नाही. त्यामुळे गोंडेगाव सर्कलमधून त्यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.